Ticker

6/Breaking/ticker-posts

तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिप चौकशीतून लवकरच सत्य समोर ? समितीचे कामकाज सुरू

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ऑडिओ क्लिपसंबंधी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचं कामकाज सुरू झालं आहे. समितीसमोर आज निमंत्रित करण्यात आलेल्या १८ पैकी १३ जणांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. मात्र, स्वत: देवरे, त्यांचा चालक आणि आणखी काही जण चौकशीला आलेच नाहीत.

 सायंकाळी राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्थानिक अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीवर दबाव येण्याची शक्यता असल्याने राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली होती. त्यावरून आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीन महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली. उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ अध्यक्ष तसंच आणखी एक उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार वैशाली आव्हाड सदस्य आहेत.सोमवारी या समितीने १८ जणांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यापैकी १३ जणांनी समितीसमोर येऊन आपले जबाब नोंदवले. त्यांचे चित्रिकरणही करण्यात आलं आहे.

 सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. समितीच्या सदस्य पाटील यांना अचानक बाहेर गावी जावे लागल्याने अध्यक्ष आणि एका सदस्यासमोर कामकाज झाले.जबाब नोंदवण्यासाठी देवरे यांनाही बोलावण्यात आलं होतं. मात्र, आज त्या समितीसमोर आल्याच नाहीत. त्या नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ अधिकारी संघटनेने केलेल्या आंदोलनासाठी त्या उपस्थित होत्या. त्या आणि त्यांचे वाहनचालक समितीसमोर आलेच नाही. 

स्थानिक अधिकाऱ्यांच्या समितीवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे नि:पक्ष चौकशी होणार नसल्याची भूमिका अधिकाऱ्यांच्या संघटनेनं घेतली आहे.या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांच्या संघटनेनं केली. याबाबतचे निवेदन सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. त्यावेळी तहसीलदार देवरे याही उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या