Ticker

6/Breaking/ticker-posts

मंदिर मुद्द्यावर सरकारला इशारा देणारे अण्णा हजारे आंदोलनापासून दूरच..

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

राळेगणसिद्धी : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनात उतरण्याचा इशारा दिलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज झालेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेच नाहीत. मात्र, या आंदोलनाला आपण पाठिंबा का दिला, यासंबंधीची भूमिका हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी आज आंदोलन झाले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी हजारे आमच्यासोबत असल्याचे सांगितले.

नगरच्या मंदिर बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारे यांची भेट घेऊन मंदिरे उघडण्यासंबंधीच्या आंदोलनाची माहिती दिली होती. यावर आंदोलनास पाठिंबा देत हजारे यांनी तुम्ही मोठे आंदोलन करा मी त्यात सहभागी होईल, असे आश्वासन दिले होते. यावरून राज्यभर विविध चर्चा झाल्या. हजारे यांच्यावर टीकाही झाली. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या अध्यात्मिक आघाडीतर्फे राज्यभर शंखनाद आंदोलन झाले. मात्र, हजारे स्वत: यामध्ये कोठेही सहभागी झाले नाहीत. राळेगणसिद्धी गावात असे आंदोलनही झाले नाही.


मंदिर बचाव समितीशी बोलताना आपण ती भूमिका का जाहीर केली? यासंबंधी आता हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आणखी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘करोनाचे कारण सांगून मंदिरे बंद ठेवली आहेत. केवळ मंदिरे नव्हे तर सर्वच धर्माची प्रार्थनास्थळे बंद आहेत. ती खुली झाली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. एका बाजूला दारूची दुकाने उघडी आहेत. मॉल सुरू आहेत. राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत, त्यांना करोनाची भीती नाही आणि धार्मिक स्थळांनाच का? हा प्रश्न पडला, त्यामुळे आपण ही भूमिका घेतली. मंदिरे ही आपली संस्कार केंद्रं आहेत. मी स्वत: मंदिरामुळेच घडलो. आजही मंदिरातच राहतो. त्यामुळे संस्कार देणारी मंदिरे बंद ठेवायची आणि पिढी बिघडविणारी दारूची दुकाने सुरू ठेवायची, हे मनाला पटत नाही. सरकार चुकत असेल तर विरोधकांनी आंदोलने केलीच पाहिजेत, असा सल्ला मी त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे,’ असेही हजारे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘सरकारची धोरणे चुकीची आहेत. सत्ताधारी जेव्हा चुकीच्या मार्गाने चालतात तेव्हा विरोधकांनी आंदोलने केली पाहिजेत. अण्णा हजारेंवर ८४ व्या वर्षी आंदोलनाची वेळ आणली जावी हे बरोबर नाही. विरोधकांनी आंदोलन करावे. असे असले तरी मंदिर उघडण्यासाठी मी पुढे यायचे ठरविले आहे. कारण माझी जडणघडण मंदिरातून झाली. फक्त डोळे झाकून बसण्याचे ते ठिकाण नाही. तिथून चांगली माणसे घडतात. यावर कोणाचे काहीही मत असले तरी हा माझा अनुभव आहे. याच उद्देशाने मी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.असेही हजारे यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या