Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यभर मुसळधार..! पुढचे ३-४ दिवस सुरुच राहणार, तब्बल १८ जिल्ह्यांना इशारा

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात पुढच्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाही तर येत्या २४ तासांतही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडवर असून त्याचा प्रभाव महाराष्ट्र राज्यावर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई-ठाणे उत्तर कोकणातसुद्धा पाऊस असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. पण आता हा जोर वाढेल असं हवामान खात्याचे म्हणणे आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचा परिणाम विविध राज्यात होणार आहे.

बुलढाणा, अकोला, वाशिम, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवामान खात्याकडून करण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असून अकोल्यात आजही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

कोकणात रत्नागिरी येथे रविवारपासून मंगळवारपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला जाणवेल. सिंधुदर्गात रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. ठाणे, रायगड येथे मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघरमध्ये बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मुंबईमध्ये मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे येथे बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

मध्य महाराष्ट्रात नाशिकमध्ये मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. जळगाव येथे सोमवारी आणि मंगळवारी, नंदुरबारमध्ये मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र सध्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर फारसा वाढणार नाही. राज्यात विदर्भ क्षेत्रामध्येही आठवडा अखेरीस पावसाचा जोर वाढलेला दिसेल. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रविवारी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या