Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठी टक्का घालवू नका ; शरद पवारांचा असाही ‘मराठी बाणा’

 *पवारांनी जागवल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आठवणी

*घरं न विकण्याचं बीडीडी चाळीतील रहिवाशांना आवाहन









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वरळी इथं झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी मराठी मुंबईचा सूर लावला. ' पुनर्विकासानंतर घरं विकू नका. इथल्या भागातला मराठी टक्का घालवू नका,' असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी बीडीडी चाळीतील तमाम रहिवाशांना केलं.

' आजचा दिवस महाराष्ट्रासाठीचा महत्त्वाचा दिवस आहे. आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणाचा दिवस. टिळकांना अटक झाली होती तेव्हा या संपूर्ण गिरणगावामध्ये बंद पाळला गेला होता. ब्रिटिशांना कष्टकऱ्यांची शक्ती काय आहे ते तेव्हा कळले. महाराष्ट्र जागवण्याची कामगिरी करणारे लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. या दिवशी एक महत्त्वाचा प्रकल्प आपण हातामध्ये घेत आहोत याचा मला मनापासून आनंद आहे,' असं पवार म्हणाले.


शरद पवार यांनी आपल्या भाषणात बीडीडी चाळीची संस्कृती, मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आठवणी जागवल्या. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, कॉ. शाहीर अमरशेख, मास्टर भगवान, सुनील गावसकर, पु. ल. देशपांडे यांचं या गिरणगावाच्या परिसरामध्ये वास्तव्य होतं. इतिहास निर्माण करणारे लोक इथं निर्माण झाले. काळानुसार या चाळींमध्ये बदल केले पाहिजेत, इथल्या लोकांना अधिक सुविधा द्यायला पाहिजे, मालकी हक्क दिला पाहिजे. आताच्या प्रकल्पामुळं हे होणार आहे. उद्या इथं २० मजली, ३० मजली इमारती उभ्या राहतील. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरं मिळतील. पण या इमारतींमधून इथला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका. ही प्रॉपर्टी, तुमच्या कष्टाचा ठेवा, तुम्ही विकू नका. अधिक सवलतींच्या जागा पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवा. इथल्या भागातला मराठी टक्का घालवू नका. मराठी आवाज दिसला पाहिजे, टिकला पाहिजे. ती खबरदारी घ्या,' अशी जाहीर विनंती शरद पवारांनी यावेळी केली.

' अलीकडं महाराष्ट्रावर सतत काहीना काही संकटं येत आहेत. अतिवृष्टीचं संकट मोठं आहे. या संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. एकीकडं पूरग्रस्तांची घरं बांधण्याचं आव्हान तर दुसऱ्या बाजूस शंभर वर्षे मुंबईत कष्ट करून देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल टाकलं जातंय हे ऐतिहासिक आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे,' अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा गौरव केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या