लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:
गेले चार पाच वर्षे सततच्या तोट्यामुळे अडचणीत
आलेल्या साखर उदयोगाला यंदा मात्र अच्छे दिन आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात
वाढलेली मागणी, साखरेच्या दरात झालेली वाढ आणि
पुढील हंगामातील कच्च्या साखरेचे सुरू असलेले सौदे यामुळे कारखानदारांच्या पदरात
चांगली रक्कम पडत असल्याने कारखानदारांना साखरेची चव अधिकच गोड झाली आहे. यामुळे
यंदा कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षात देशातील बहुसंख्य साखर कारखाने
तोट्यात चालत आहेत. साखरेला नसलेला दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नसलेली मागणी आणि एफआरपी देण्यासाठी संघटनांचा
आग्रह यामुळे हा उद्योग अडचणीत आला होता. मात्र, गेल्या काही
दिवसांत साखर कारखान्यांना चांगले दिवस आले आहेत. ब्राझिलमध्ये साखर उत्पादन कमी
झाल्याने भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. आतापर्यंत
६० लाख मे. टन साखरेची निर्यात झाली असून अजूनही ५ ते १० लाख मे. टनाची मागणी आहे.
पुढील हंगामात उत्पादित होणाऱ्या कच्च्या साखरेचे आंतरराष्ट्रीय सौदे आत्तापासून
सुरू झाले आहेत. त्याचा फायदा कारखान्यांना होत आहे.
कमी
दरामुळे गोडावूनमध्ये साखर पडून होती. गेल्यावर्षीची ११० लाख मे. टन आणि यंदाची
३०६ मे. टन साखर गोडावूनमध्ये होती. त्याची सध्या चांगल्या दराने विक्री सुरू झाली
आहे. खुल्या बाजारातील दर प्रति क्विंटल ३३०० रूपयेपर्यंत गेल्याने कारखान्यांना
चांगले पैसे मिळत आहेत. करोनाचा संसर्ग कमी झाल्याने टाळेबंदी उठली आहे. यामुळे
बाजारात उलाढाल वाढली आहे. सणांचा हंगाम सुरू झाल्याने अजून साखरेला मागणी
वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांना अच्छे दिन येणार आहेत.
केंद्राने साखरेला प्रति क्विंटल ३५०० रूपये दर
निश्चित करावे अशी कारखानदारांची मागणी आहे. सरकारने याबाबत अजूनही निर्णय घेतला
नसला तरी खुल्या बाजारात अचानक दर चांगला मिळाल्याने कारखान्यांना जादा पैसे मिळत
आहेत. यामुळे यंदा नवीन हंगाम सुरू करण्यासाठी नवीन कर्ज काढावे लागण्याची शक्यता
दिसत नाही.
साखर उद्योग दृष्टीक्षेप
गळित हंगाम झालेले देशातील कारखाने ४३९
राज्यातील साखर उत्पादन १०६ लाख मे. टन
देशातील साखर उत्पादन ३०६ लाख मे. टन
गेल्यावर्षीची शिल्लक साखर ११० लाख मे. टन
परदेशात निर्यात ६० लाख मे. टन
0 टिप्पण्या