Ticker

6/Breaking/ticker-posts

पेट्रोल दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करा !; सीतारामन यांना दिल्या 'या' अनोख्या शुभेच्छा

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: इंधन दरवाढीसंबंधी सातत्याने भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दरवाढीचा संबंध दिला आहे. अर्थात सोशल मीडियातून या अनोख्या शुभेच्छावर विविध प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

अर्थमंत्री सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना.

इंधन दरवाढ, त्याची कारणे, त्यावरील उपाय, केंद्र व राज्य सरकारचे कर यासंबंधी पवार सातत्याने भाष्य करीत असतात. राज्य सरकारचे कर कमी करावेत, अशी भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्यांना उत्तरे देताना दिसतात. केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच इंधनाचे दर वाढले असून ते नियंत्रणात आणणे केंद्राच्याच हातात आहे, हे पटवून देणाऱ्या अनेक पोस्ट त्यांनी लिहिल्या आहेत. इंधनाचे दर कमी करण्यासंबंधी केंद्र सरकारने काही पावले उचलण्याचे ठरविल्यानंतर, दर स्थिर राहिले किंवा किंचित कमी झाल्यावर त्यांनी केंद्र सरकारचे कौतुकही केलेले आहे.

अलीकडेच पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयासंबंधीही विधान केले होते. पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणल्यास पेट्रोलच्या किमती नक्कीच २० ते २२ रुपयांनी कमी होऊन ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु यासाठी केंद्र तयार होणार नाही. करोना संकटाला देवाची करणी म्हणत राज्यांना जीएसटीची भरपाई नाकारत राज्यांना कर्ज घेण्यास भाग पाडणाऱ्या केंद्र सरकारला हा निर्णय घेणे अशक्य नाही, परंतु यातून मिळणारा महसूल सरकार सोडू शकत नाही, असेही पवार यांनी म्हटले होते. 

आता सीतारामन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना पवार यांनी पुन्हा मिश्कीलपणे यावर टिपण्णी केली आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी राजकीय टीकाही केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या