Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबई वगळता राज्यात अन्यत्र आज ऑफलाइन शिष्यवृत्ती परीक्षा

 

*राज्यात अन्यत्र गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी ही परीक्षा

* पहिला पेपर सकाळी ११ ते दुपारी साडेबारा आणि दुसरा पेपर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत होईल.

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : पाचवी आणि आठवी या वर्गांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा आज, गुरुवारी आयोजित केली जाणार आहे. ऑफलाइन स्वरूपात जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या परीक्षेचा पहिला पेपर सकाळी ११ ते दुपारी साडेबारा आणि दुसरा पेपर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत होईल. करोनासंबंधीचे नियम पाळून ही परीक्षा घेतली जाईल. एका बाकावर एक विद्यार्थी आणि एका वर्गात केवळ २४ विद्यार्थी बसविण्याच्या सूचना परीक्षा परिषदेने दिल्या आहेत. मात्र, अनेक केंद्रांवर पुरेशा सुविधा नसल्याने एका बाकावर दोन विद्यार्थी बसवावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. दरम्यान, बुधवारी नवोदय विद्यालय प्रवेशांसाठीची ऑफलाइन परीक्षाही घेण्यात आली.

पात्रता काय?

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यास उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केले जाणार नाही. पात्र किंवा अपात्र या स्वरूपात निकाल जाहीर होईल. त्यानुसार प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरतील. त्यांच्यामधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. ही परीक्षा मराठी, उर्दू आणि इंग्रजी या तीन माध्यमांतून होणार आहे. प्रत्येक माध्यमांसाठी अ, , क आणि ड पद्धतीने प्रश्नसंच देण्यात येतील. उर्वरित भाषांसाठी फक्त एकच प्रश्नसंच असेल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

 

मुंबईत सर्वच शाळांमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द

  मुंबईतील सर्वच शाळांमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभगाने घेतला आहे. मंगळवारी केवळ पालिका शाळांपुरता निर्णय घेतल्याने संभ्रम वाढला होता.


मुंबईतील करोनास्थिती लक्षात घेता तसेच अद्याप येथे शाळा सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्याने येथे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करू नये, असे पत्र पालिकेने राज्य परीक्षा परिषदेला पाठवले होते. यानुसार शिक्षण विभागाने मुंबईतील पालिका शाळांतील परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय मंगळवारी घेतला. मात्र शहरातील खासगी शाळांमध्ये ही परीक्षा होणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण होते. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अद्याप आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने पालिका आयुक्तांनी दिलेले आदेश पाळणे सर्वांनाच बंधनकारक आहे. असे असतानाही पालिका शिक्षण विभागाने केवळ पालिका शाळांपुरताच निर्णय घेतल्याने बुधवारी दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते.

खासगी शाळांमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द करावी, अशी मागणी करत शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे तसेच शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी भेट घेऊन या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर संध्याकाळी राज्य परीक्षा परिषदेशी चर्चा झाल्यानंतर संगवे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळांमध्ये परीक्षा रद्द करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले. ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल याबाबत लवकरच कळविले जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या