Ticker

6/Breaking/ticker-posts

'इस्रो'ला जबर झटका, GISAT-1 उपग्रहाचं प्रक्षेपण फसलं..

 

*जीएसएलव्ही एफ - १० (मार्क २) उपग्रहाचं प्रक्षेपण फसलं

*'मिलिटरी इंटेलिजन्स'साठी उपयुक्त उपग्रह






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संघट्ना अर्थात इस्रोला  आज पुन्हा एकदा जोरदार झटका बसलाय. आज पहाटे ५.४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटाहून जीएसएलव्ही एफ - १० (मार्क २) द्वारे पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाचं दुसऱ्या लॉन्च पॅडहून प्रक्षेपण करण्यात आलं. परंतुGISAT-1 उपग्रह कक्षेत स्थापित होण्यास अपयशी ठरलं.

या उपग्रहाद्वारे शत्रुद्वारे खास करून चीन आणि पाकिस्तानद्वारे जमिनीवर होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जाणार होतं. प्रक्षेपण यशस्वी झालं असतं तर 'मिलिटरी इंटेलिजन्स'साठी हा उपग्रह अत्यंत फायदेशीर ठरला असता. त्यामुळेच या उपग्रहाला 'आय इन द स्काय' म्हटलं गेलं. लष्कराशिवाय हा उपग्रह कृषी, जंगल, खनिजशास्त्र, नैसिर्गिक संकटांची सूचना देण्यासाठी, क्लाऊड प्रॉपर्टीज, बर्फ, हिमनद्या आणि महासागराच्या किंवा जंगलाच्या रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी हा उपग्रह फायदेशीर ठरला असता.

जीएसएलव्ही (GSLV) अर्थात 'जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल'द्वारे निरीक्षण उपग्रह EOS - 03 ला अंतराळात 'जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट'मध्ये स्थापित करण्याची योजना होती. परंतु, मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं उपग्रह मार्गातून भटकला आणि आपल्या निश्चित कक्षेपर्यंत पोहचू शकला नाही.

उपग्रहाला 'जियो स्टेशनरी ऑर्बिट'मध्ये स्थापित करण्याची योजना होती. लॉन्चिंगसाठी काऊंटडाऊनला बुधवारी पहाटे ०३.४३ वाजता सुरूवात झाली. संपूर्ण मोहीम १८ मिनिट ३६ सेकंदात पूर्ण होणं अपेक्षित होतं. परंतु, लॉन्चिंगनंतर १० मिनिटांतच कंट्रोल रुममधील वातावरण तणावाचं दिसू लागलं. त्यामुळे मोहिमेत काहीतरी अडथळा आल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

काही मिनिटांत इस्रो अध्यक्ष के सीवन यांनी ही मोहीम अपयशी ठरल्याची माहिती देशाला दिली. क्रायोजेनिक इंजिनच्या कार्यात अडथळा आल्याचं त्यांनी सांगितलं. तांत्रिक बिघाडामुळे या उपग्रहाची माहिती इस्रोपर्यंत पोहचू शकली नाही.

जीएसएलव्ही लॉन्चिंगचं आजची चौदावी मोहीम होती. यातील आतापर्यंत आठ मोहिमा आतापर्यंत यशस्वी ठरल्या आहेत तर ४ मोहिमा फसल्या. २ मोहिमा अंशत: यशस्वी ठरल्या. त्याचमुळे जीएसएलव्ही मार्क १ चा यशस्वी दर २९ टक्के तर जीएसएलव्ही मार्क २ चा यशस्वी दर ८६ टक्के राहिला.

GISAT-1  या उपग्रहाला EOS-03 असंही नाव देण्यात आलंय. करोना  संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून या उपग्रहाचं प्रक्षेपण टळलं होतं. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यातही प्रक्षेपणाची तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु, त्यावेळीही कोविड १९ नियमांमुळे प्रक्षेपण होऊ शकलं नव्हतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या