लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: करोना संसर्गामुळे सर्वसामान्य लोक हवालदिल झाले
असतानाच बोगस डॉक्टरांनी मात्र झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटल्याची गंभीर बाब
उघडकीस आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पालिका अधिकाऱ्यांच्या
बरोबरीने गोवंडी, शिवाजीनगरमध्ये
एकाच वेळी छापे टाकून ५ बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. कोणतीही पदवी किंवा प्रशिक्षण घेतले नसतानाही उपचार करून हे
डॉक्टर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत होते.
गोवंडी, शिवाजीनगर मधील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा
घेऊन बोगस डॉक्टरांनी व्यवसाय थाटला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस
निरीक्षक हणमंतराव ननावरे आणि सहायक फौजदार नितीन सावंत यांना मिळाली. प्रभारी
पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी पोलिसांची
पथके तयार करण्यात आली. पालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयातील सहायक वैद्यकीय
अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांची देखील यासाठी मदत घेण्यात आली. पोलीस आणि
डॉक्टरांच्या पथकाने एकाच वेळी पाच क्लिनिकमध्ये छापा टाकला. बेसावध असलेल्या बोगस
डॉक्टरांकडे पदवी तसेच इतर प्रमाणपत्रांबाबत विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडून
उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली तसेच त्यांनी दाखविलेली प्रमाणपत्रं दुसऱ्यांच्या
नावावर तसेच काही बोगस असल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांना अटक करण्यात आली.
या क्लिनिकवर कारवाई
पोलीस आणि पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्षमा, अलिशा, आसिफा,
रेहमत अशा पाच क्लिनिकवर कारवाई केली. या कारवाईत
पोलिसांनी स्टेथेस्कोप, वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स,
सर्जिकल ट्रे, सलाइन बाटल्या, अनेक प्रकारच्या गोळ्या तसेच बरेच वैद्यकीय साहित्य हस्तगत केले. या पाच
डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर
पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या