Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमधील 'ती' धक्कादायक घटना; तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अ.नगर: आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणताना वाहनातून पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंबंधी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत एका उपनिरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडली होती. पोलिसांची गाडी अडवून काही गुडांनी पतीला मारहाण केल्याची फिर्याद आरोपीच्या पत्नीने दिली होती. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले होते. शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक माहितीनुसार वाहनातून पडून आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सायंकाळी पोलिसांवर कारवाईचा आदेश दिला. भिंगार कँप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार नैमुद्दीन शेख व पोलीस कर्मचारी पालवे यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी भिंगारचे पोलीस आरोपी सादिक बिराजदार (वय ३२ रा. मुकुंदनगर) याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात निघाले होते. भिंगार नाला परिसरात सादिक जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी फिर्याद देऊन आरोपी बिराजदार याने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहनातून उडी घेतल्याने तो जखमी झाल्याची फिर्याद दिली होती. तर बिराजदार याच्या पत्नीने दुसरी फिर्याद देऊन गुंडांनी वाहन अडवून आपल्या पतीला मारहाण केल्याचे म्हटले होते. रुक्सार बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी करण्याचा आदेश अधीक्षक पाटील यांनी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांना दिला होता. ढुमे यांनी आपला अहवाल पाटील यांच्याकडे सादर केला. पोलिसांकडून आरोपीला पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येते. सादिक बिराजदार याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांच्याकडे होता. बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी सहायक फौजदार शेख व कर्मचारी पालवे हे गेले होते. यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून यामध्ये तिघेही दोषी आढळले असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

गंभीर जखमी बिराजदार याच्यावर उपचार सुरू असताना १९ ऑगस्टला सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने नियमानुसार खास समितीसमोर पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल आज मिळाला. डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे यात म्हटले आहे. फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या