Ticker

6/Breaking/ticker-posts

‘मूळ भाजपवाले भंगारात तर बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’-शिवसेना

 *शिवसेनेची भाजपवर जहरी टीका

*आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबईः भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे शिवसैनिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. शिवसेना नेत्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही भाजपवर बरसले. त्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.

' भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे,' असा इशारा यावेळी शिवसेनेनं दिला आहे.

' शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच, असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित 'खांद्यावर'च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना 'खांदेकरी' ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे,' असा इशाराही शिवसेनेने दिला आहे

'शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकड्या नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटरातून वाहून गेले. ते पुन्हा कधीच कोणाला सापडू शकले नाहीत. शिवसेना भवन फोडू अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय?,' असा संतप्त सवाल शिवसेनेनं केला आहे.

' शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

' त्या भवनावर शिवरायांचा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे. या भगव्या झेंडय़ाचा पोटशूळ काही मंडळींना उठल्यामुळेच शिवसेना भवन फोडण्याची मस्तवाल भाषा त्यांनी केली. खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या