Ticker

6/Breaking/ticker-posts

नारायण राणेंचा चिपळूण दौरा वादाच्या भोवऱ्यात.; 'या' मंत्र्याचा थेट इशारा

 *तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात

 *शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला थेट इशारा.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 सातारा: पूरग्रस्त चिपळूण शहराचा दौरा करत असताना तिथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पारा चढला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते तावातावाने बोलले. ' सीएम बीएम गेला उडत' असा भाषाप्रयोग करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून झापले. त्यावरून शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून गृहराज्यमंत्री शम्भुराजे देसाई यांनी आज राणे यांना थेट शब्दांत इशारा दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा चिपळूण दौरा सध्या चर्चेत आहे. मंत्री झाल्यानंतर राणे यानिमित्त प्रथमच राज्यात आले आणि अनेक कारणांनी वादात अडकले आहेत. पूरग्रस्त चिपळूणला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी राणे आले होते मात्र, तिथे जिल्हाधिकारी वा अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्य म्हणजे त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा चिपळूण दौऱ्यावर होते. त्यामुळे बहुतेक अधिकारी त्यांच्यासोबत होते. त्यावरूनच राणेंचा पारा चढला आणि त्यांनी एका अधिकाऱ्याला समोरच झापले, शिवाय फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांनाही खडसावले.

यात रागाच्या भरात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी बोलताना राणे यांचा तोल गेला. ' सीए बीएम गेला उडत. मला नावं नका सांगू कुणाची. इथे कोण अधिकारी आहे ते सांगा. इतके दिवस तुम्हाला खूप सोसलं पण आता नाही', अशा शब्दांत राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दम भरला होता. राणे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीतून तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवण्यात येत आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज याविषयी प्रतिक्रिया देताना राणे यांना थेट शब्दांत इशारा दिला आहे.

' नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे. पण पक्षाने सांगितले म्हणून आम्ही सारे शांत आहोत. जर पक्षाकडून आदेश आला तर राणे यांना जशास तसे उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री आहोत, हे लक्षात ठेवा', असे नमूद करतानाच नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल विचारपूर्वक शब्द वापरावेत, असा इशारा देसाई यांनी दिला.

अजित पवारांनीही सुनावले खडेबोल
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याबद्दल आपली नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली आहे. ' पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आम्हीही विरोधी पक्षात असताना असे दौरे केले पण जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, असे विचारत बसलो नाही. आपण पूरग्रस्तांना भेटायला आलोत की अधिकाऱ्यांना भेटायला आलोत, याचे भान प्रत्येकाला असले पाहिजे', असा सल्ला देतानाच मुख्यमंत्र्यांबद्दल एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली गेली नव्हती, असे पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या