Ticker

6/Breaking/ticker-posts

फिनिक्स फौंडेशनच्य शिबीरात स्वातंत्र्य दिनी नागरिकांचा देहदानाचा संकल्प

देहदानाने आपल्या स्मृती कायम जीवंत राहतील - जालिंदर बोरुडेलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर - आपण गेल्यावर आपली कायम स्वरुपी आठवण ही दुसर्यांनी ठेवावी, आपले नाव रहावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पैसा, संपती ही नश्वर आहे, त्यामुळे मनुष्याने असे कार्य करुन जावे, की ज्याची किर्ती सर्वांपर्यंत पोहोचेल. नेत्रदान - देहदान केल्याने आपल्या नंतर गरजवंतांना त्याचा उपयोग होतो. आपणास मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानातून मिळालेले आहे, त्यांचे बलिदान आजही आपणा सर्वांच्या मनामध्ये आहे. त्याचप्रकारचे कार्य हे देहदानातून घडणार आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी नेत्रदान-देहदान करुन आपल्या स्मृती कायम जीवंत  राहतील, असे कार्य करावे, असे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 19 नागरिकांनी देहदानाचा संकल्प करुन अर्ज भरुन दिले. याप्रसंगी अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ.वैभव देशमुख, बाबासाहेब धिवर, वैभव दानवे, राजेंद्र बोरुडे आदि उपस्थित होते. 

पुढे बोलतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य उभे केले असून, गरजूंना मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. मोफत नेत्रशिबीराच्या माध्यमातून लाखो लोकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे, आणि यापुढेही असेच सुरु राहील. त्याचप्रमाणे देहदानाबाबत जागृती करुन लोकांना त्यासाठी उस्फुर्त करण्यात येत आहे, त्यास नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. आज देहदानाचे संकल्प पत्र भरुन देणारे हे गरजवंतांसाठी देवदूतच आहेत. अशा उपक्रमातून समाजातील दु:ख नाहिसे करण्याचा प्रयत्न यानिमित्त केला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी डॉ.वैभव देशमुख म्हणाले, आज आरोग्य सेवा महाग होत चालली आहे. अशा परिस्थितीत जालिंदर बोरुडे फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून गरजूं रुग्णांना मोफत सेवा देत आहे ती समाजासाठी आदर्शवत बाब आहे. अशा उपक्रमांचे इतरांनाही अनुकरण केले पाहिजे. देहादान चळवळ वाढविण्यासाठी ते करत असलेले कार्य गरजू रुग्णांना जीवनदान देणारे ठरेल, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात बाबासाहेब धिवर यांनी फिनिक्स फौंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राजेंद्र बोरुडे यांनी सर्वांचे आभार मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या