*आढावा बैठ्कीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने
जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत
आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा व्यक्ती आणि
आस्थापनांवरील कारवाई गतिमान करा आणि कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक
उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.
राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढतानाचे चित्र दिसत आहे. काही तालुक्यातील गावांमध्ये सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात आहे. ही चिंताजनक बाब असून स्थानिक यंत्रणेने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हिवरे बाजार पॅटर्न अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांची जबाबदारी गावपातळीवर महत्वाची असून त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिक क्रियाशील होण्याची गरज आहे. गावांमध्ये अथवा जिल्ह्याच्या नागरी भागात विविध कार्यक्रमांसाठी गर्दी होत असल्याचे आणि तेथे कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. अशावेळी अशा कार्यक्रमांशी संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करुन फिरणारे कोरोना पसरवणारे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. तालुकास्तरीय यंत्रणांनी तसेच महानगरपालिका क्षेत्रातही नेमलेल्या विविध पथकांनी त्यांच्यावर कारवाई करावी. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या गंभीरपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, विशेषता सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळे आदी ठिकाणी नियमांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील ही गर्दी रोखावी. राज्य शासनाने दिलेल्या सवलती व्यतिरिक्तच्या वेळेत आस्थापना सुरु असल्याचे दिसल्यास कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
0 टिप्पण्या