Ticker

6/Breaking/ticker-posts

आक्रमक राणे झाले एकदम नम्र 'तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेन का? '; वाचा हे खास पत्र

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांना संधी देण्यात आली. राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला. ही नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर राणे यांनी सर्वांचे आभार मानणारे पत्र लिहिले असून आपल्या मनातील भावना त्यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. 

केंद्रीय मंत्रिपदापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सर्वांचे जे प्रेम आणि सहकार्य मिळाले आहे त्याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेन काय?, असा प्रश्न स्वत:लाच करत राणे यांनी त्रिवार आभार मानले आहेत.

शिवसेना शाखाप्रमुख ते केंद्रीय मंत्री असा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. या प्रवासात राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह अनेक पदे भूषविली. काँग्रेस सोडल्यानंतर गेली काही वर्षे राणे सत्तापदापासून दूर होते. अशावेळी भाजपने त्यांना थेट केंद्रात संधी दिली असून केंद्रीय नेतृत्वाने हा जो विश्वास टाकला आहे त्यामुळे राणे आनंदित आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राणे यांनी सर्वांनाच धन्यवाद दिले होते व जी जबाबदारी मिळाली आहे ती सक्षमपणे पार पाडेन, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता राणे यांनी एक जाहीर पत्र लिहून सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फड्णवीस यांच्यामुळे मिळाली असे नमूद करत राणे यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.

केंद्रात मंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी मला फोन करून आणि अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या. काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, अशा भावना राणे यांनी या पत्रातून मांडल्या आहेत. 

तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत राहो, ही नम्र अपेक्षा. आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?, असा प्रश्न माझ्या मनात दाटला आहे, अशा हृद्य भावना व्यक्त करताना भविष्यात प्रत्यक्ष भेटू व बोलू, असे राणे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या