Ticker

6/Breaking/ticker-posts

सारखं सारखं डिवचल्यास आम्ही त्यांचे बारा वाजवू

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

सातारा: 'कोविड संसर्गाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे देशभरातून कौतुक झाले. त्यामुळे विरोधकांमध्ये पोटशूळ उठला आणि आमच्या पक्ष नेतृत्वाला थांबविण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या मार्गाने षडयंत्र रचू लागले. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला सारखं सारखं डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही त्यांचे बारा वाजवू', असा थेट इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सातारा जिल्हाचे शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी दिला.

सातारा जिल्हा शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उदय सामंत बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री  शम्भुराजे देसाई आमदार महेश शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव उपस्थित होते. सामंत पुढे म्हणाले की, पक्ष वाढविणे ही चूक नाही तर ती आपली जबाबदारी असून गाव तेथे शाखा हा शिवसेनेचा पाया आहे. 

शाखेतून सामाजिक काम केले तरच पक्षसंघटना मजबूत होत असते. ही संपर्क मोहीम आपल्या सर्वांच्या ताकदीवर राबवायची असून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे लोकहिताचे निर्णय घेतले ते या मोहीमेतून गावोगावी पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करायचे आहे. विकासकामांबरोबर आपण पक्ष संघटनेसाठी किती काम करतो हे महत्त्वाचे असून पक्ष संघटनेत काम करताना कोणीही विश्वासघात करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.

पक्ष संघटना वाढविणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून आगामी काळात सातारा जिल्ह्यात आणखी दोन ते तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असला पाहिजे, असे आवाहन यावेळी शंभूराज देसाई यांनी केले.

मुख्यमंत्रिपदाचा उपयोग जनसामान्यांच्या कामासाठी करायचा असून शिवसैनिकांनी युती, आघाडीची चिंता न करता संघटना, शाखा वाढवून त्या कार्यरत करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्रितपणे काम केले तसेच काम आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करून शिवसेना हा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनवण्याचा आपण संकल्प करूया. त्यासाठी सारे मिळून एकदिलाने काम करूया, असे आवाहन देसाई यांनी केले. 

महेश शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी ही तीन पक्षांची असली तरी आपला पक्ष वाढविणे महत्त्वाचे आहे. उद्या आघाडी होईल अथवा न होईल परंतु पक्ष व संघटना महत्त्वाची असून प्रत्येक शिवसैनिकाने गाव व बूथ मजबूत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला पाहिजे तरच जिल्ह्यात चांगला बदल घडवता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या