Ticker

6/Breaking/ticker-posts

विठ्ठल दर्शनाच्या ओढीने 'त्या' वारकऱ्यांनी गर्दी केली ; अन अचानक..

 *पालखी सोहळ्यातील शेकडो वारकरी दर्शनासाठी आग्रही.

*मंदिर परिसरात वारकऱ्यांनी गर्दी केल्याने झाला गोंधळ.

*समजूत काढल्यानंतर विठ्ठलाचा जयघोष करत वारकरी परतले.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पंढरपूर:  पंढरपूर शहरातील १९५ स्थानिक वारकरी महाराज मंडळींना दर्शन दिल्यानंतर पंढरपूरकडे आलेल्या मानाच्या १० पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी दर्शनाची मागणी करीत मंदिर परिसरात गर्दी केल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला. यानंतर पालखी सोहळा प्रमुख आणि मंदिर प्रशासन यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने हे वारकरी परतले. मात्र दोन ते तीन तास शेकडो वारकऱ्यांनी उत्तर दरवाजा समोर गर्दी केल्याने संचारबंदी आणि  करोना नियमांचे तीनतेरा वाजले आणि तणावही निर्माण झाला.

मानाच्या १० पालखी पादुकांसह पौर्णिमेला विठ्ठलाच्या भेटीला येतात. यावेळी पालखी सोबतच्या वारकऱ्यांना देवाचे दर्शन देण्याची प्रथा आहे. मात्र या वारकऱ्यांना नेमका कोणी निरोप दिला हे समजले नसले तरी शेकडो वारकरी अचानक मंदिराजवळ आल्याने प्रशासन गोंधळात पडले. 

अखेर मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, प्रांताधिकारी सचिन ढोले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे,  संत तुकाराम महाराज  सोहळा प्रमुख संजय मोरे आणि इतर मान्यवरांशी चर्चा केल्यावर तोडगा निघाला. प्रशासन शासनाशी चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचे माऊली पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी सांगितले. यानंतर मात्र पालखी सोहळ्यातील जमलेले सर्व वारकरी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून विठ्ठलाचा जयघोष करीत मठांमध्ये परतले आणि तणावही निवळला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या