Ticker

6/Breaking/ticker-posts

आडवा येणार त्याला संपवणार !; दहशत निर्माण करण्यासाठी दातीर यांचा खून

 

*९५० पानांचे दोषारोपपत्र दाखल.

*जमिनीच्या वादातून सुपारी देऊन घडवून आणली हत्या.

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 राहुरी : आपल्या कामात आडवे आल्यावर आपण कोणालाही सोडत नाही, अशी दहशत निर्माण होऊन भविष्यात कोणीही नादी लागू नये, यासाठी राहुरीतील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी त्यांचे अपहरण करून जंगलात नेले, तेथे त्यांचा खून केला आणि लोकांमध्ये दहशत बसविण्यासाठी मृतदेह पुन्हा गावात आणून टाकल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याच्यासह चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी ९५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.


राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षकसंदीप मिटके  यांच्या पथकाने वेगाने पूर्ण केला. यातील आरोपी कान्हू गंगाराम मोरे, लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी, तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे या चौघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्थिक मदत केल्याचा आरोप असलेला व्यापारी अनिल जनार्धन गावडे यालाही या गुन्ह्यात आता आरोपी करण्यात आले आहे. ६ एप्रिल २०२१ रोजी पत्रकार दातीर दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळून आला.

हे प्रकरण राज्यभर गाजले. तपासात हा गुन्हा आरोपी मोरे याने जमिनीच्या वादातून सुपारी देऊन केल्याचे उघड झाले. त्यानंतर एका पाठोपाठ एक आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा तपास पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे सोपविला. त्यांनी मुख्य आरोपी मोरे याला नेवासा फाटा येथून अटक केली. तर एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. बाकीचे आरोपी राहुरी परिसरात हाती लागले. या आरोपींना व्यापारी गावडे याने आर्थिक मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी केले जाणार नाही, अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु पोलिसांनी त्यालाही आरोपी केले.

असा रचला कट

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याचे व पत्रकार रोहिदास दातीर यांचे गणेगाव येथील शेतीवरून वाद होते. त्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढण्याचे मोरे याने ठरविले. त्याने साथीदार तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे, लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी या तिघांना राहुरी येथे बोलावून घेतले. दातीर यांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली. आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये ॲडव्हान्स रक्कम दिली. कामासाठी स्वतःची मोटार दिली. त्यानुसार आरोपींनी राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरून पत्रकार दातीर यांचे अपहरण केले. वाहनातून दरडगाव येथील जंगलात निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लोकांमध्ये दहशत निर्माण होऊन भविष्यात कोणीही नादी लागू नये, यासाठी दातीर यांचा मृतदेह राहुरी शहरात आणून टाकून आरोपी पळून गेले, असा आरोप दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या