Ticker

6/Breaking/ticker-posts

वाड्यात सापडलेले गुप्तधन; चर्चा होताच घरमालकानं घेतला 'हा' निर्णय

 *जुन्या वाड्याचं खोदकाम करताना सापडलं गुप्तधन

*मजुरांच्या माध्यमातून गावभरात सुरू झाली चर्चा

*चर्चा होताच घरमालकानं घेतला महत्त्वाचा निर्णय







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 श्रीरामपुर (जि. अहमदनगर) : श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथे जुन्या वाड्याच्या आवारात खोदकाम सुरू असताना गुप्तधन सापडल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर संबंधित घरमालकानेच जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून पुर्वजांनी गुप्तधन पुरलेले असल्याचा दावा करून चौकशीची मागणी केली. त्यानुसार आज (बुधवारी) महसूल विभागाचे अधिकारी तेथे जाऊन पंचनामा करणार आहेत. तहसिलदार प्रशांत पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश दिला असल्याचे सांगण्यात आले.


बेलापूर येथील एका व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. आपल्याला काही प्रमाणात गुप्तधन सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घरात पूर्वजांनी धन पुरून ठेवल्याची या कुटुंबीयांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी अनेकदा खोदकाम करून घेतले होते. मात्र, काहीच हाती लागले नव्हते. अलीकडेच पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले. ते सुरू असताना दहा-बारा दिवसांपूर्वी एक हंडा सापडला. त्यात सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात येते. मजुरांमार्फत ही चर्चा गावात पसरली.
सध्या हा हंडा घरमालकाने ताब्यात घेतला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याची चर्चा वाढल्याने आता त्या संबंधित घरमालकानेच जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून याची माहिती देत चौकशीची मागणी केली. गुप्तधन असल्याची माहिती होती, त्यानुसार खोदकाम करताना काही प्रमाणात ते सापडले आहे, त्यामुळे प्रशाससाने नियमानुसार पंचनामा करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यानुसार स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश दिला. त्यानुसार आता या ठिकाणी खोदकामाचे चित्रिकरण करून पंचनामा केला जाणार आहे. जमिनीखाली सापडलेल्या संपत्तीची मालकी सरकारची असते. त्यामुळे तेथे जर खरेच काही सापडले तर ते सरकारी तिजोरीत जमा केले जाणार आहे. महसूल अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचे पथक बुधवारी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा करणार असल्याचे सांगण्यात आले.

हा प्रकार परस्पर दडपण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, मजुरांकडून गावात माहिती पसरल्याने आपल्या अंगलट येऊ नये, यासाठी उशिरा का होईना घरमालकाने याची माहिती प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पाहणीत नेमके काय आढळून येणार? याची उत्सुकता गावकऱ्यांना लागली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या