Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी कसली कंबर

 लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

पारनेर: करोनाची संभाव्य तिसरी लाट गावाबाहेरच थोपविण्यासाठी आदर्शगाव राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. यासाठी सध्या घरोघरी जाऊन आरटीपीआर चाचण्या केल्या जात असून लसीकरणाचाही वेग वाढविण्यात आला आहे. संपूर्ण गावाची चाचणी आणि लसीकरण करण्याचे उद्दिष्टय ठेवून काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच डॉ. धननंजय पोटे यांनी दिली.


राळेगणसिद्धी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील २८ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यातील दोघांचा मृत्यूही झाला. आता असे संकट पुन्हा येऊ नये, यासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे.

यासंबंधी पोटे यांनी सांगितले की, 'गावात आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोयीच्या ठिकाणी बुथ उभारण्यात आले आहेत. तरी जे ग्रामस्थ येऊ शकत नाहीत, त्यांच्या घरी जाऊन चाचणी करणार आहोत. शंभर टक्के ग्रामस्थांची चाचचणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांचीही चाचणी करण्यात आली. सुदैवाने ती निगेटीव आली. त्यासोबतच लसीकरणाची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ३० टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि धोका असेल्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे. आता तर घटकांवर लक्ष केंद्रीत केले असून जशी लस उपलब्ध होईल, तसे काम सुरू आहे. आपल्यापासून काळजी घेण्यास आम्ही सुरवात करणार आहोत.'

या उपक्रमाची सुरवात नुकतीच करण्यात आली. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी सरपंच मंगल मापारी, ग्रामपंचायत सदस्य मंगल उगले, सुनिल हजारे उपस्थित होते. तसेच डॉ. अपूर्वा वाघमारे, आरोग्य सहाय्यक रमाकांत जगताप, आशा कर्मचारी मंगल मापारी, सुनिता सोनवणे, स्वाती गडकर उपस्थित होते. डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, 'राळेगणसिद्धीत चाचणी आणि लसीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. अशीच काळजी इतरही गावांनी घेतली पाहिजे. गावांनी पुढाकार घेतल्यास आम्ही सरकारी यंत्रणा आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहोत.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या