Ticker

6/Breaking/ticker-posts

'त्या' व्यवहारासाठी RTO च्या एनओसीची गरज नाही

 


*आरटीओच्या कार्यक्षेत्रात वाहन विक्रीवरून संभ्रम

*कुठल्याही एनओसीची गरज नाही ; परिवहन विभागाचा खुलासा

लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

अहमदनगर: राज्यात इतर आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनाची विक्री केल्यास ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) आवश्यकता नसल्याचे परिपत्रक यापूर्वीच परिवहन आयुक्तांनी काढले आहे, त्याप्रमाणेच सध्याही कामकाज सुरू आहे. मात्र, तो नियम रद्द होऊन पुन्हा एनओसीची पद्धत सुरू झाल्याच्या बातम्या सोशल मीडियातून प्रसारित होत आहेत, त्या बातम्या खोट्या असून असा कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती परिवहन विभागातर्फे देण्यात आली आहे.


सोशल मीडिया तसेच काही वर्तमानपत्रात इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन विक्री केल्यास एनओसी पुन्हा लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त अहमदनगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या नावाचा संदर्भ देऊन प्रसारित करण्यात येत आहे. यासंबंधी पाटील यांनी सांगितले की, परिवहन आयुक्तांनी दिलेल्या कार्यपद्धतीद्वारेच संपूर्ण महाराष्ट्रभर कामकाज चालू आहे. त्यामुळे एनओसी पूर्ववत करण्यात आल्यासंदर्भात सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रात आलेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे.

 

 

या प्रकारे चुकीचे संदेश प्रसारित करून जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. सोशल मीडिया तसेच काही वर्तमानपत्रात राज्यातील इतर जिल्ह्यातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन विक्री केल्यास एनओसी पुन्हा लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त आपल्या नावाचा संदर्भ देऊन प्रसारित करण्यात आले होते. मात्र, असा कोणताही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावरील वृत्त निराधार आणि चुकीचे असून आता अशा प्रकारे वाहन विक्री केल्यास एनओसीची आवश्यकता नाही. परिवहन आयुक्तांनी यापूर्वीच जारी केलेल्या यासंबंधीच्या परिपत्रकानुसारच कामकाज सुरू आहे. या खोट्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये. यासाठी कोणी अडवणूक करीत असल्यास परिवहन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व सरकारी कार्यालयांचेही कामकाज सुरू झाले आहे. परिवहन विभागातही नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांच्या विक्रीची नोंदणी सुरू झालेली आहे. अशा काळातच सोशल मीडियात चुकीचे संदेश पसरल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संदेश पाठविणाऱ्यांनी खोडसाळपणे पाटील यांचे नाव जोडल्याने यासंबंधी त्यांच्याकडेही विचारणा होत आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या