Ticker

6/Breaking/ticker-posts

आषाढी वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल- संभाजी भिडे

 

आषाढी वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे- संभाजी भिडे.

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 सांगली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असेलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आषाढी वारी आणि करोनाचा संबंध लावणारे नवे वक्तव्य केले आहे. आषाढी वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे असे वक्तव्य करत आषाढी वारीला परवानगी द्या म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.


या बरोबरच मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणीही भिडे यांनी केली आहे.

आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून होत असली तरी करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने वारीला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारताना सरकारने मानाच्या १० पालख्यांना १०० वारकऱ्यांसह बसमधून जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र ही वारी पायीच झाली पाहिजे, अशी भिडे यांची मागणी आहे. दारुच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलिस अडवत नाहीत. पण मास्क न घालता फिरणाऱ्यांना मात्र ५०० रुपये दंड केला जातोय, याकडेही संभाजी भिडे यांनी लक्ष वेधले आहे.

संभाजी भिडे यांनी यापूर्वी मास्कबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे?, सवाल उपस्थित करत काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे, असे वक्तव्य भिडे यांनी करत वाद ओढवून घेतला होता. हातावर पोट असणारी माणसे उद्ध्वस्त होत असून शिक्षण क्षेत्रही उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही, असेही ते म्हणाले. राज्यात व्यसने वाढवायचे काम सुरू आहे. गांजा, अफू आणि दारुची दुकाने वाढवायचे काम सुरु आहे, असे सांगतानाच कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या