Ticker

6/Breaking/ticker-posts

३० ते ४४ वयोगटाला आजपासून मोफत लस
 लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई : करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेची व्याप्ती आज, सोमवारपासून अधिक वाढणार आहे. केंद्र सरकारने सोमवार, २१ जूनपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज झाली असून त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. लसीकरणासाठी नोंदणी तसेच इतर अडचणी येऊ नयेत, म्हणूनही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठीच, पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १८ ते २९ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

 

महापालिकेने आठवड्यातील तीन दिवस हे थेट लसीकरणासाठी राखीव ठेवले आहेत. त्यानुसार, आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी कोणतीही नोंदणी न करता थेट लस घेता येणार आहे. तर गुरुवार ते शनिवार हे तीन दिवस मात्र रितसर नोंदणी करूनच लस दिली जाणार आहे.


मुंबईत लसीकरणाचा वेग वाढत असतानाच, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी खासगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. एकीकडे, सध्या शहरात खासगी रुग्णालयांप्रमाणेच कॉर्पोरेट कार्यालये तसेच विविध गृहनिर्माण संस्थांनीही लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्याचा संयुक्त परिणाम म्हणून लसीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. तर दुसरीकडे, पालिका वा सरकारी केंद्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटासाठी लस देणे थांबविण्यात आल्याने मुंबईतील हजारो रहिवासी अद्यापही लशीपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, आता केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठी मोफत लस उपलब्ध करण्याची घोषणा केल्याने लसीकरणाला प्रतिसाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबई महापालिकेने ऑनलाइन नोंदणीप्रमाणेच थेट केंद्रावर जाऊन लस घेण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यासाठी या वयोगटातील व्यक्तींना सोमवार ते बुधवार हे तीन दिवस कोणत्याही अॅपवर किंवा ऑनलाइन नोंदणी न करता केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, पालिकेने काही ठराविक वयोगटांचे टप्पे करण्याचेही ठरविले आहे. त्यात ३० ते ४४ वर्षे व १८ ते २९ वर्षे असे दोन टप्पे करून लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

फेरीवाले, रिक्षाचालकांना प्राधान्य

पालिकेच्या लसीकरण मोहिमेत फेरीवाले, रिक्षाचालकंना प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. दररोज मोठ्या प्रमाणात लोकांच्या संपर्कात येणाऱ्या या घटकांचे लसीकरण झाल्यास करोनावर नियंत्रण मिळविण्यात अधिक यश येईल, असा हेतू आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी याबाबत सूतोवाच केले आहे.

पुरवठ्याकडे लक्ष

सोमवारपासून पुरेशा प्रमाणात लशींचा साठा उपलब्ध व्हावा, याकडे पालिकेचे लक्ष आहे. पुरेसा पुरवठा नसल्याने लसीकरण मोहिमेला याआधीही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारकडून लशींच्या पुरवठ्यात खंड पडू नये, अशी पालिकेची अपेक्षा आहे.

सध्या पालिकेच्या केंद्रांवर दररोज १०० लशींचा साठा दिला जात आहे. सध्या पालिकेकडे एक लाख ११ हजार लशींचा साठा असून त्यानुसार लशींचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे या केंद्रांवर १०० ऐवजी ३०० लशी दिल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी स्पष्ट केले.

मोफत लसीकरण

- १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे दोन टप्पे

- प्रारंभी ३० ते ४४ वर्षे वयोगटाला लस

- त्यानंतर १८ ते २९ वर्षांच्या व्यक्तींना लसीकरण


विनानोंदणी थेट लस : सोमवार, मंगळवार, बुधवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या