Ticker

6/Breaking/ticker-posts

मंत्रालयात ओळखीची बतावणी : तलाठ्याची नोकरी लावून देतो सांगून उकळले १८ लाख

 






लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नगरः मंत्रालयात ओळख असल्याने महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगत दोघांनी अकोले तालुक्यातील एका युवकाकडून सुमारे साडेअठरा लाख रुपये उखळले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या युवकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

शेखर नंदू वाघमारे (वय ३०, रा. अकोले) यांनी यासंबंधी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) व विजयकुमार श्रीपती पाटील (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी त्याच्याकडून पैसे उकळलेच शिवाय परत मागायला गेल्यावर शिवीगाळ व धमकी दिल्याचाही आरोप आहे.


वाघमारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, नातेवाईकांच्या ओळखीने जोंधळे व पाटील आपल्या संपर्कात आले. यातील पाटील हे आपली मंत्रालयात आणि मंत्र्यांकडे ओळख असल्याचे सांगत होते. या ओळखीतून अनेकांना नोकऱ्या लावून दिल्याचेही ते सांगत होते. वाघमारे यांना तलाठी पदावर नोकरी देऊ असे आश्वासन दिले. भरती नसली तरी महसूल विभागाच्या कोट्यातून नोकरी लागू शकते. त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. पाटील जे सांगत होते, त्याची जोंधळे यांनी हमी घेतली. शिवाय पाटील यांनी यापूर्वी नोकरी लावलेल्या काही उमेदवारांची नियुक्ती पत्रेही वाघमारे यांना दाखविली होती. त्यामुळे वाघमारे यांचा विश्वास बसला. त्यांनी जुलै २०२० ते १५ मार्च २०२१ या काळात जोंधळे व पाटील यांना वेळोवेळी पैसे दिले. १४ लाख, ४५ हजार रोख दिले. तर ४ लाख, २ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने असे १८ लाख ४७ हजार रुपये दिले.

 

पैसे देऊन बराच काळ झाला तरीही नोकरीचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय वाघमारे यांना आला. त्यांनी जोंधळे यांच्याशी संपर्क साधून नोकरी नसेल तर पैसे परत द्या, अशी मागणी केली. तर उलट जोंधळे यांनीच वाघमारे यांना शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे वाघमारे यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या