Ticker

6/Breaking/ticker-posts

पदावरून हटवल्यानंतरही सुटेना सरकारी लाभाचा मोह ; गुन्हा दाखल

 






लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

मुंबई : काँगो देशाचा मानद सल्लागार असल्याचे सांगून  ४ वर्षे राज्य व केंद्र सरकारची फसवणूक करणारे अमित अग्रवाल यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगरवाल हे सरकारी कामांना हजर राहात होते. पदावरून हटविण्यात आल्यानंतरही शासकीय योजनांचा लाभ घेऊन राज्य व केंद्र सरकारची फसवणूक करणाऱ्या या आरोपीस मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-२च्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

काँगोचे भारतामधील मानद सल्लागार म्हणून अमित अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये काँगोने पत्रव्यवहार करून अगरवाल यांची भारतामधील मानद सल्लागार या पदावरील नियुक्ती मागे घेण्याबाबत विनंती केली होती. या विनंतीवरून भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाने त्यांची भारतामधील नियुक्ती रद्द करण्यास मान्यता दिली.

 

 नियुक्ती मागे घेतल्याचे भारत सरकारने २०१७ मध्ये काँगोच्या वकिलातीला कळविले. अगरवाल यांनाही पत्र पाठवून याची माहिती देण्यात आली होती. मानद सल्लागार या नात्याने यापुढे कोणतेही व्यवहार, कृती, कोणत्याही कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी होता येणार नाही त्यामुळे या पदाचा वापर बंद करावा, अशा सूचनाही अग्रवाल यांना करण्यात आल्या होत्या.

४ वर्षे दुरुपयोग

या पदावरून हटविण्यात आल्यावर ४ वर्षांनंतरही अगरवाल हे या पदाचा दुरुपयोग करीत असल्याचे नवी दिल्लीतील काँगोच्या प्रथम वकिलात यांच्या निदर्शनास आले. अगरवाल हे राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या अधिपत्याखालील संस्थाशी संपर्क करून पदाचा गैरवापर करत शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचेही दिसून आले. अगरवाल यांची कृती विश्वासघातकी असल्याचे सांगत वकिलातीने याबाबत मुंबई पोलिसांना कळविले. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या