Ticker

6/Breaking/ticker-posts

' घार उडते आकाशी, तिचे लक्ष पिलापासी...' जवानाच्या मदतीने ठाकूर निमगाव ग्रामस्थांचे डोळे पाणवले


*संवेदनशील जवान ज्ञानेश्वर निजवे यांचा कोविड रुग्णांना दिलासा ; १३ हजार कि.मी.वरून ५ हजाराची मदत*

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

  शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :-' घार उडते आकाशी, तिचे लक्ष पिलापासी ' या उक्तीचा प्रत्यय नुकताच ठाकूर निमगाव (ता.शेवगाव) च्या ग्रामस्थांना आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठाकूर निमगावचे ग्रामस्थ बेचैन आहेत. येथील १६ जण दगावले.तर, मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले रुग्ण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विलगीकरण कक्षात आहेत. या रुग्णांच्या दैनंदिन खर्चासाठी इंडियन आर्मीतील संवेदनशील जवान व ठाकूर निमगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर निजवे धावून आले.

      त्यांनी तब्बल १३ हजार किलोमीटरवरून पाच हजार रुपयांची देणगी फोन पे- ने पाठवून ' तुम्ही एकटे नाही , मीही तुमच्या सोबत आहे ' हे कृतीतून दाखवून दिले. ही रक्कम छोटी असली तरी, ती पाठवणा-यांचे मन आभाळाएवढे मोठे असल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे ऊर भरून आले.तर, ग्रामस्थांचे डोळे पाणवले.

      ज्ञानेश्वर निजवे २० वर्षापासून इंडियन आर्मीत सेवेत असून ते दिल्लीच्या सेव्हन मराठा इन्फंट्रीत हवालदार पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक सातासमुद्रापार १३ हजार किलोमीटरवर आफ्रिका खंडातील कांगो या देशात शांती सेनेत आहे. तेथे माओवाद्यांचे प्रस्थ मोठे आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे युनिट सध्या कांगो येथे आहे.

      इंडियन आर्मीतील जवान अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात आहेत. कणखर व लढावय्या सैनिकांप्रती तमाम भारतीयांना आदर व अभिमान आहे. ठाकूर निमगावमध्ये कोरोना संसर्गाने थैमान  घातले आहे. सरपंच सौ. सुनिता कातकडे व त्यांचे सहकारी या संकटाचा धैर्याने मुकाबला करत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष आहे. येथील निवासी रुग्णांच्या दैनंदिन खर्चासाठी भूमिपुत्रांकडून देणग्यांचा ओघ सुरू आहे. संवेदनशील जवान ज्ञानेश्वर निजवे यांनी या कार्याला हातभार लावत पाच हजार रुपयांची मदत पाठवून खारीचा वाटा उचलला आहे. ही बाब सर्वांसाठीच अभिमानाची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या