Ticker

6/Breaking/ticker-posts

चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबईचा थरकाप; वाऱ्याचा वेग ताशी ११४ कि.मी. पर्यंत !

 चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम, मुंबईसह 'या' शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: तौत्के चक्रीवादळ मुंबईजवळच्या समुद्रातून पुढे सरकत असताना मुंबईला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारे आणि पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्याचा कहर सुरू असून दुपारी दोन वाजता वाऱ्याचा वेग ताशी ११४ किलोमीटर पर्यंत पोहचला होता. वादळी वाऱ्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठ वाजेपर्यंत मुंबई विमानतळ बंद ठेवण्यात आला असून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकर हादरून गेले आहेत. तौत्के चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याचा मोठा फटका मुंबईला बसला आहे.  महापालिकेची ६० स्वयंचलित हवामान केंद्रे असून या केंद्रांवर त्या-त्या ठिकाणी होत असलेल्या पावसाच्या नोंदी सह वाऱ्याच्या वेगाचीही नोंद घेतली जात आहे. या नोंदीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक वाऱ्याचा वेग हा कुलाबा परिसरात असणाऱ्या अफगाण चर्च नजीक नोंदविण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता १११ किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग नोंदविण्यात आला तर दुपारी दोन वाजता च्या सुमारास ११४ किलोमीटर प्रति ‌तास एवढा वेग नोंदविला गेला. मुंबईत पुढच्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचवेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी पर्यंत वाढू शकतो, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबईत वादळी वारे आणि पाऊस यामुळे स्थिती भीषण बनली असून पालिका व संबंधित यंत्रणा हाय अॅलर्ट मोडवर आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिह चहल  यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे केलेल्या विविध स्तरीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. मुंबईत हिंदमाता, मिलन सबवे या भागात पाणी भरले आहे तर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. उपनगरात काही ठिकाणी बैठ्या चाळींचीही पडझड झाली आहे. ही स्थिती लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम

मुंबई : सोमवारी मुंबईनंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आहे. पण असं असलं तरी या वादळाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झाली आहे. पण मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. खरंतर, कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांचं, घरांचं आणि गाड्यांचं नुकसान झालं आहे.

सोमवारी तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रूप मुंबईने पाहिलं. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

मुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुमाधव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या