Ticker

6/Breaking/ticker-posts

खरच दानत ! अंगणवाडी सेविकेने कोविड सेंटरला दिला महिन्याचा पगार

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

जामखेड : अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळते. ते वाढवून मिळावे म्हणून अधूनमधून त्यांच्या संघटनांची आंदोलने सुरू असतात. अपुऱ्या मानधनावर गुजरण करताना दान करण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. मात्र, जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख याला अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या एक महिन्याचा पगार (मानधन) जामखेडमधील डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी म्हणून दिला.  

करोनाचा प्रसार वाढल्याने नि:शुल्क सेवा देणारी कोविड केअर सेंटर सुरू झाली. मात्र, ही सेंटर दानशुरांच्या मदतीने चालविली जातात. उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांच्याकडून मदत मिळणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी शिक्षकांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर उभारली आहेत. मात्र, तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार चालविणे कठीण असलेल्या अंगणवाडी सेविकेने आपला महिन्याचा पगार कोविड सेंटरला दान करणे ही वेगळी गोष्ट ठरते. राज्य सरकारकडे करोनासंबंधी उपाययोजनांसाठी निधीची कमतरता आहे. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन करण्यात आले. त्यालाही अनेकांनी विरोध केला. काहींनी हा विरोध जाहीरपणे व्यक्तही केला. अंगणवाडीसेविकेपेक्षा जास्त पगार असलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण एक दिवसाचा पगार देण्यास खळखळ करीत आहेत. येथे मीनाताई शेख यांनी संपूर्ण महिन्याचा पगारच कोविड सेंटरला दिला.

मुस्लिमांमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच संपला. या महिन्यात उपवास (रोजे) ठेवले जातात. या काळात दान (जकात) करावे, असेही या धर्मात सांगितले आहे. आपल्या एकूण उत्पन्नातील काही भाग दान द्यायचे असते. याही उद्देशाने शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार दिला आहे. मुळात अंगणवाडी सेविकांना पाच ते आठ हजार रुपये मानधन मिळते. तुलनेत हे दान अल्प आहे. मात्र, शेख यांच्या दृष्टीने महिन्याचा पगार म्हणून त्याची किंमत मोठी आहे.

जामखेड तालुक्यात सेवाभावी पद्धीने वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रवी आरोळे यांची करोना काळातील सेवाही उल्लेखनीय आहे. त्यामुळे शेख यांनी दान देतानाही त्यांची निवड केली. आपला एक महिन्याचा पगार त्यांनी डॉ. आरोळे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जामखेड पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती भगवान मुरुमकर, माजी सभापती सुभाष आव्हाड, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक धेंडे, नय्युम शेख, समीर शेख उपस्थित होते.

  “ आरोळे कोविड केअर सेंटरमध्ये संपूर्ण तालुक्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. गरीब रुग्णांना मोफत सेवा तेथे दिली जाते. त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मी रमजान ईदचे औचित्य साधून एक महिन्याचा पगार दिला आहे. दानशूर व्यक्तींनीही मदतीसाठी पुढे यावे.’’

मीनाताई मुसा शेख, अंगणवाडी सेविका, जवळा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या