Ticker

6/Breaking/ticker-posts

'या' गावाला सापडला करोनाला हरवण्याचा अनोखा पॅटर्न !

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र भोकर तालुक्यातील भोसी या गावाने करोनामुक्त होऊन राज्यासाठी नांदेडने आणखी एक पॅटर्न दिला आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या भोकर तालुक्यातील भोसी गावात ११९ करोनाबाधित रुग्ण शेतात राहून कोरोनामुक्त झाले. अवघ्या पंधरा दिवसानंतर सर्वच बाधित करोनामुक्त झाले.नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात ६ हजार लोकवस्तीचे भोसी गाव आहे. साधारण दोन महिन्यापूर्वी येथे एका लग्न सोहळ्यानंतर एक मुलगी बाधित आढळली. त्यानंतरच्या आठवड्यात आणखी पाच जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली.

 कसा आहे करोनामुक्तीचा अनोखा पॅटर्न ?

गावात करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी ग्रामपंचायतीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत भयभीत झालेल्या ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले आणि गावात जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चाचण्यांना सुरुवात झाली.या तपासण्यांमध्ये तब्बल ११९ जण बाधित निष्पन्न झाले. तपासणीनंतर बाधित आलेल्यांची तेथूनच शेतात रवानगी करण्यात आली.

 यासाठी प्रत्येकाच्या शेतात राहण्याची सोय करण्यात आली होती. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची सोय भोसीकर यांच्या शेतातील ४० बाय ६० आकाराच्या एका शेडमध्ये केली होती. हे सर्व बाधित सुमारे पंधरा दिवस शेतामध्येच राहिले. आरोग्य सेविका, आशा वर्कर दररोज शेतात जावून बाधितांशी संवाद साधत होत्या. तसेच गरजेनुसार रुग्णांना जागेवरच औषधे पुरविण्यात आली. दुसरीकडे या बाधितांच्या जेवणाची सोयही शेतामध्येच करण्यात आली होती. त्यामुळे पंधरा दिवसानंतर सर्वच्या सर्व ११९ बाधित कोरोनामुक्त झाले. त्यानंतर दीड महिना उलटून गेला मात्र तेथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

भोसी ग्रामस्थांनी आणि जिल्हापरिषद सदस्य ,आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी भोसी पॅटर्न तयार केला असून आता हा पॅटर्न जिल्ह्यात राबवणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या