Ticker

6/Breaking/ticker-posts

बाजारपेठेसह संपूर्ण बंद, तरीही रस्त्यावर वर्दळ कशी ?; पोलिसांनीच शोधला जालीम उपाय, सडक सख्याहारीना चाप..!

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नगर: संपूर्ण बाजारपेठ बंद, एवढेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेतील बहुतांश दुकानेही बंद. तरीही रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी होत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी यावर जालीम उपाय शोधला आहे. उद्यापासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यात संसर्ग झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी तर करण्यात येईलच, पण त्याच्या घरी जाऊन कुटुंबियांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांद्वारे आरोग्य विभागाच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. याशिवाय नगर शहरात मनपा आयुक्तांनी किराणा आणि भाजीपाला विक्रीही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. १५ मेपासून निर्बंध शिथील करण्यात आले होते. मात्र, गर्दी झाल्याचे दिसून आल्याने दोन दिवसांतच सवलत मागे घेण्यात आली.

आता १ जूनपर्यंत नगर शहरात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला, फळे, अंडी, चिकन यांची दुकानेही बंद राहणार आहेत. सुरवातीचे दोन आणि मधले दोन दिवस वगळता शहरात महिनाभराचा कडक लॉकडाऊन होत आहे. असे असले तरी नगर शहरात आणि जिल्ह्यातही वर्दळ कमी झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गर्दी होणाऱ्या दोन प्रमुख ठिकाणी तपासणी नाके असणार आहेत. तेथे विनाकारण बाहेर पडलेले नागरिक आढळून आल्यास त्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

टेस्ट पॉझिटीव्ह आली तर संबंधिताला लगेच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल. त्याच्या घरी जाऊन घरातील सदस्यांचीही चाचणी करण्यात येईल. त्यांच्यापैकी कोणी बाधित आढळून आले तर त्यांनाही कोविड सेंटरला पाठविण्यात येईल. नियम मोडल्याच्या दंडाव्यतिरिक्त ही कारवाई असणार आहे. त्यामुळे चाचणी निगेटीव आली तरीही संबंधितांना दंड होऊ शकतो, अशी माहिती पाटील यांनी दिली.

नगर शहरासोबतच ग्रामीण भागातही अशीच मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंबंधी सर्व तहसिलदारांना आदेश दिला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी अशी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. तेथे पोलिसांसोबत अँटीजेन कीटसह आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश देण्या आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या