Ticker

6/Breaking/ticker-posts

दिलासादायक : करोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरणार ?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई :- करोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत असताना, ही दुसरी लाट केव्हा ओसरणार, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये सातत्याने येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी १५ दिवस ते एक महिन्यामध्ये ही लाट उतरणीला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांनी सर्व करोना नियमांचे काटेकोर पालन करायला हवे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

राज्याच्या मृत्युदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी आतापर्यंत आलेल्या करोना संसर्गाच्या लाटा या दोन महिन्यांच्या कालावधीने ओसरायला लागल्याचे दिसते, असे सांगितले. संसर्गाचा जोर उतरणीला लागण्याचा हा प्रकार सगळीकडे थोड्याबहुत फरकाने दिसून आला आहे. जितक्या वेगाने ही लाट वर गेली आहे, तितक्याच वेगाने ती खाली येणे अपेक्षित आहे. यापूर्वीच्या लाटा थोड्या धीम्या प्रकारे खाली आल्या होत्या. मात्र, आता या संसर्गाच्या लाटेमध्ये असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता, हा संसर्ग लवकरच उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्याची लाट हळूहळू खाली येण्याच्या वैद्यकीय विश्लेषणामध्ये मागील लाटेमध्ये ६० टक्के व्यक्तींना करोना संसर्गाची लागण वा किमान संपर्क तरी झाला आहे. त्यामुळे या लाटेमध्ये उरलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाची लागण गृहीत धरली, तर समूह प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी मदत होईल, असाही वैद्यकीय अंदाज व्यक्त होत आहे.

डॉ. सुपे यांनी मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या स्थिर दिसत असल्याचे सांगितले. सात ते आठ हजारांच्या मध्ये रुग्णसंख्या अजून काही दिवस राहिली, तर रुग्णसंख्या उतरणीला लागण्याची दाट शक्यता आहे.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सव्वा ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये रुग्णसंख्येचा आलेख खाली उतरायला लागेल, असे सांगितले. येत्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख निमुळता होऊन हळूहळू संसर्गाची उतरंड सुरू होईल. मात्र, या कालावधीमध्ये संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गर्दी न करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्कचा वापर करणेही गरजेचे आहे, यावरही डॉ. जोशी यांनी भर दिला. काही वैद्यकीय संशोधनामध्ये डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१.५ टक्के लोकसंख्येमध्ये अॅण्टीबॉडी विकसित झाल्याचे म्हटले आहे. एप्रिलच्या अखेरीस यामध्ये सात टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे. तर लसीकरणाच्या माध्यमातून १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लसीकरणाचा दुसरा डोस झाल्यानंतर किती टक्के व्यक्तींमध्ये संसर्गाची पुन्हा लागण होते याचाही अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या