Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय आवश्यक- महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात

 *कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेवगावात बैठक*





**जमावबंदी आदेशाचे कारण देत पत्रकार व कार्यकर्त्यांना बाहेर ताटकळत ठेवले*

*पत्रकार परिषदेतून मंत्रिमहोदयांचा काढता पाय*

*वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी धारेवर*

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :-देशात कोरोना बाधीत रुग्णांसाठी आवश्यक आँक्सीजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याने राज्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारचे सर्व स्तरावर प्राधान्याने प्रयत्न सुरु आहेत. उद्भवलेल्या या आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी समन्वय ठेवून काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी केले. 

     काल शनिवारी (दिं.२४ रोजी) शेवगाव येथे पार पडलेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत महसुलमंत्री ना. थोरात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ. राजश्री घुले,आ.सुधीर तांबे, मा.आ.चंद्रशेखर घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक,मुख्याधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते. 

    ना.थोरात पुढे म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी, राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध तसेच नियम व निर्देशाची नागरिकांनी अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या निश्चितपणे हळूहळू कमी होईल. आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करत असल्याने समाजातील सर्व घटकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

         या बैठकीत ना.थोरात यांनी विचारलेल्या प्रश्नांवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी व वैदयकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर काटे यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली.वेळी जि.प.सदस्य राहुल राजळे, ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, डाँ. मेधा कांबळे, केदारेश्वरचे संचालक माधव काटे, शरद सोनवणे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटकेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डाँ. अमोल फडके आदींसह अवघे १० ते १२ कार्यकर्ते  उपस्थित होते. मात्र,जमावबंदीचे कारण देत पत्रकारांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना प्रशासनाने बाहेर ताटकळत ठेवले. बैठकीनंतर मंत्रीमहोदयांनी पत्रकार परिषदेचा  फार्स करत तीही काही मिनिटातआटोपती घेत काढता पाय घेतला. त्यामुळे पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या