Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीचा तुटवडा ; २७० डोस दुपारी दीडलाच संपले ..!

 


* ज्येष्ठ नागरिक कडक उन्हात उभे

* पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही

* आमदार मोनिका राजळे यांना धारेवर धरले

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव  (जगन्नाथ गोसावी) :- कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कडक उन्हात तासनतास उभे राहावे लागते तसेच त्यांना येथे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नसल्याने ज्येष्ठांनी तक्रारीचा पाढाच आमदार मोनिका राजळे यांचेपुढे वाचला. यामुळे काही वेळ दस्तुरखुद्द आमदार मॅडमही  स्तब्ध झाल्या. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःला सावरत लागलीच येथे सोयी - सुविधा पुरविण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

       कोरोना विषाणूचा वाढता फैलाव, रुग्णांची दिवसागणिक झपाट्याने होणारी वाढ , मृत्युदर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाने केलेल्या उपाय योजनांचा आढावा आज शुक्रवारी (दिं. ९) दुपारी साडेबारा वाजता आमदार राजळे यांनी रुग्णालयाला समक्ष भेट देऊन घेतला. यावेळी त्यांचे समवेत तहसीलदार अर्चना पागिरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, नायब तहसीलदार रमेश काथवटे आदी उपस्थित होते.        कोरोना प्रतिबंधक लसीचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातही हाहा:कार उडाला आहे. शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात आज अवघे २७० डोस उपलब्ध झाले, तेही दुपारी दीडला संपले. त्यामुळे रुग्णालय परिसरात लस टोचून घेण्यासाठी आलेल्या हजारो ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. परिणामी, आरोग्य कर्मचाऱ्यांना ज्येष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

     शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी लसीचे डोस दिले जाणार असल्याने ज्येष्ठ नागरिक सकाळी नऊपासूनच कडक उन्हाची पर्वा न करता रांगेत तिष्ठत उभे होते. त्यात महिलांची संख्या मोठी होती. सोशल डिस्टंसिंगचाही पुरता फज्जा उडाल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, शेतमजूर यांचेबरोबरच वकील, पत्रकार, निवृत्त पोलिस, टपाल कर्मचारी व शिक्षकांची संख्या मोठी होती. तथापि, दुपारी दीडलाच लसीचे डोस संपल्याने या सर्वांची निराशा झाली. मात्र, निष्ठेने सेवा पुरविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हा सर्व प्रकार आमदार मोनिका राजळे व तहसीलदार अर्चना पागिरे यांचे समक्ष घडला. या प्रकाराची तालुक्यात दिवसभर चर्चा झडत होती .

             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या