Ticker

6/Breaking/ticker-posts

ब्रेकिंग: MPSC exam: अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली ;ठाकरे सरकारचा निर्णय..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली  एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केल्याचे समजते. थोड्याचवेळात यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल. तेव्हा राज्य सरकार MPSC परीक्षेची पुढची तारीख आत्ताच जाहीर करणार का, हे बघावे लागेल.

 

काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. आता राज्य सरकारकडून लवकरच 11 एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा आदेश काढला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

परीक्षा रद्द करण्याची मागणी कोणी केली होती?

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन पुन्हा चर्चा

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या