* सदरचे वाहन सोडून देण्याची पोलिसांवर नामुष्की ..
दोषींविरुद्ध कडक कारवाईची भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची मागणी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :- शेवगाव पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन सोमवारी (दिं.१९ रोजी) पकडलेले ऑक्सिजन सिलेंडरचे वाहन (MH 17 CK 1569) अधिकृत असल्याने ते दोन दिवसानंतर सोडून देण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे.दरम्यान, या गंभीर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत त्यांनी शेवगावचे निवासी नायब तहसीलदार मयूर बेरड यांचेकडे सुपूर्द केली.
सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने ऑक्सीजन सिलेंडर व रेमडीसीवर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. ऑक्सीजन वेळेवर मिळत नसल्याने शेकडो निष्पाप रुग्ण अक्षरश: तडफडून मरत आहेत. सर्वत्र भयावह परिस्थिती असताना तब्बल दोन दिवस ऑक्सीजन सिलेंडरचे वाहन पोलीस ठाण्यात अडकवून पोलिसांनी नेमके काय साध्य केले ? असा प्रश्न श्री. मुंडे यांनी या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे कडक जमावबंदीचे आदेश असतानाही शेवगाव शहर व तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. फक्त त्या धंद्याच्या जागा बदलल्या ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होत नाही का ?असा उद्विग्न सवाल उपस्थित करून ते म्हणाले, शेवगाव पोलीस छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना कायदा व नियमांचे हत्यार उगारून धमकावत आहेत.
शेवगाव पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन पकडलेले ऑक्सीजन सिलेंडरचे वाहन हे औरंगाबादच्या प्लांटवरून प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या शेवगाव येथील संत श्री एकनाथ आयुर्वेद रूग्णालयात पुरवठा करण्यासाठी आले होते. तिथे चालकाने २० सिलिंडरची डिलिव्हरी दिली. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उर्वरित २० सिलेंडर स्थानिक रहिवासी असलेल्या चालकाने गोदामात ठेवण्याऐवजी हे वाहन आपल्या वस्तीवर पार्किंग केले. शेवगावच्या अजिंठा मशिनरीकडे ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकीचा अधिकृत परवाना आहे. औरंगाबादच्या रुक्मिणी व सागर ऑक्सीजन प्लांटवरून त्यांनी हे सिलेंडर भरले होते.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एका डॉक्टरने दस्तुरखुद्द शेवगावच्या पीआयला या संदर्भातील टीप दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तो मास्टर माईंड डॉक्टर कोण ? याबाबतची शेवगावकरांना उत्सुकता आहे. पोलिसांनी हे वाहन पकडल्यानंतर चालकाने सर्व आवश्यक कागदपत्रे दाखवली.
तहसीलदार अर्चना पागिरे व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी हे वाहन तात्काळ सोडून देण्याचे निर्देश देऊनही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ते सोडले नाही.तब्बल दोन दिवस वाहन पोलिस ठाण्यात अडकून ठेवले. त्यामुळे या प्रकरणातील ॲक्शन मोडमध्ये असलेल्या त्या पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकार्यांनी कारवाई करावी, असे श्री. मुंडे यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर श्री. मुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा किराणा व्यापारी असोसिएशनचे सचिव वजीर पठाण व गोपाल धूत यांच्या सह्या आहेत. या प्रकाराची तालुक्यात खुमासदार चर्चा रंगली आहे .
0 टिप्पण्या