Ticker

6/Breaking/ticker-posts

म्हणून.. त्या रात्री मी पोलीस ठाण्यात गेलो होतो?; फडणवीसांचा भलामोठा खुलासा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः  रेमडेसिविर पुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला सोडवण्यासाठी रात्रीच्या वेळी थेट पोलीस ठाण्यात गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ  रिबेरो यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांना सुनावले होते. फडणवीस सत्तेसाठी उतावीळ झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली होती. रिबेरो यांच्या लेखाला उत्तर देताना फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला असून त्या रात्रीच्या घटनाक्रमाचा खुलासा केला आहे.

ब्रूक फार्मा या कंपनीकडं रेमडेसिविरचा साठा असल्याच्या संशयावरून काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. हे समजताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व भाजपची अन्य नेते मंडळी थेट पोलीस ठाण्यात गेली व पोलिसांना जाब विचारला. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. रिबेरो यांनी लेख लिहून विरोधी पक्षनेत्याच्या या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. ' इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकात खुलं पत्र लिहून फडणवीस यांनी रिबेरो यांच्या आक्षेपांना उत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणतात, 'ब्रूक फार्मा कंपनीकडून भाजपनं इंजेक्शन मागवले होते. मात्र, त्यातील एकही इंजेक्शन भाजपसाठी नव्हते. ते सर्व इंजेक्शन महाराष्ट्र सरकारला देण्यात येणार होते. एफडीएकडून तशी मंजुरी देखील घेण्यात आली होती. मात्र, सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने कंपनीचे डायरेक्टर राजेश डोकानिया यांना फोन केला व विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरून तुम्ही इंजेक्शन कसे काय पुरवता? असा जाब विचारला. त्यावर हे इंजेक्शन सरकारलाच देण्यात येणार आहेत व त्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे, अशी माहिती डोकानिया यांनी समोरच्या व्यक्तीला दिली.

 मात्र, त्याच रात्री पोलीस डोकानियांच्या घरी गेले व रेमडेसिविरची मागणी केली. डोकानिया यांनी ते देण्यास नकार देताच रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा फोन जप्त करण्यात आला. यात काहीतरी काळंबेरं असल्याच समजताच प्रवीण दरेकर यांच्यासह काही नेत्यांनी मला या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच मी सह पोलीस आयुक्तांना सर्व माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांना लँडलाइन व मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एसएमएस केले. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अन्य काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा राजकीय डाव असल्याचं त्यांना सांगितलं. राज्याला हवी असलेली औषधे नियमानुसार पुरवणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे याची जाणीव मला त्यावेळी झाली आणि मी पोलीस ठाण्यात गेलो.'

' पोलीस ठाण्यात जाण्याआधी मी पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त व उपायुक्तांना त्याबाबत माहिती दिली होती. लपूनछपून मी तिथं गेलो नव्हतो. तिथं आम्ही एफडीएची ऑर्डर संबंधितांना दाखवली. तोपर्यंत पोलिसांना एफडीएच्या ऑर्डरबद्दल काहीच माहिती नव्हती. इतकंच नव्हे तर, ब्रूक फार्माने इंजेक्शनच्या साठा केल्याची कुठलीही ठोस माहिती त्यांना मिळाली नव्हती. पुरावे असल्यास कारवाई जरूर करा, असं मी त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं. ह्या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ फूटेज उपलब्ध आहे,' असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

' माजी मुख्यमंत्र्यांनी पोलीस ठाण्यात किंवा पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात जाणं योग्य आहे का, हा वादाचा विषय होऊ शकतो. मात्र तो निर्णय मी विचारपूर्वक घेतला होता. राज्याला औषध पुरवठा करू इच्छिणारी एखादी व्यक्ती सरकारशी संपर्क न साधता आम्हाला संपर्क साधते, केवळ या कारणावरून ती व्यक्ती गुन्हेगार ठरू नये हा माझा प्रयत्न होता,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या