Ticker

6/Breaking/ticker-posts

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा आजपासून सुरु ; तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी 'वॉर रुम' सज्ज..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे :-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा 'ऑनलाइन प्रॉक्टर्ड' पद्धतीने उद्या शनिवारी १० एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परीक्षांसाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहा लाख विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. या विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण न येता परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठाची 'वॉर रुम' सज्ज झाली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा घरबसल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटरवर देता येईल. ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करण्यात येणार आहे. गेल्या सत्र परीक्षेत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये; तसेच परीक्षेत गोंधळ होऊ नये, यासाठी परीक्षेची जबाबदारी विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनला दिली आहे. एज्युटेक फाउंडेशनकडून पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. अशा परिस्थितीत परीक्षेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आयटी कंपनीचे सहकार्य घेतले आहे.

 

या परीक्षा सुरळीत होण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळात वॉर रुम तयार करण्यात आली आहे. या वॉर रुममध्ये 'सपोर्ट'साठी साधारण ७५ कर्मचारी कार्यरत राहणार आहे.परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उद्भवू नये, यासाठी ६८ विषयांच्या परीक्षा आहेत. या परीक्षांना २६ हजार विद्यार्थी प्रविष्ठ होतील. राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी संख्या असल्याने, विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांचे लक्ष लागले आहे. विद्यापीठाच्या वॉर रुमची पाहणी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. महेश काकडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. एम. जी. चासकर यांनी गुरुवारी केली.


वॉर रुमचे विद्यार्थ्यांवर लक्ष

विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देत असतांना, त्यांना एखादी तांत्रिक अडचण उद्भवल्यास ती सोडविण्यासाठी वॉर रुम कार्यरत राहणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा देतांना विद्यार्थी गैरप्रकार तर करीत नाही, यावर संगणकीय प्रणालीचे लक्ष राहणार आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॅशबोर्डच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेची स्थिती पाहता येईल. विद्यार्थी त्यांना येणाऱ्या अडचणी चॅट बॉक्सद्वारे मांडू शकतात. त्यावर त्यांना उत्तर दिले जाईल. त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने सिस्टीद्वारे तक्रार नोंदवता येईल. यासोबतच कॉल सेंटर कार्यरत असून, त्यावर विद्यार्थ्यांना समस्या सांगता येईल

तक्रार ४८ तासात सिस्टीममधूनच नोंदवावी

सत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांचे गुण परीक्षेनंतर ४८ तासात 'स्टुडन्ट प्रोफाइल सिस्टीम'मध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील. या गुणांबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास किंवा विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवायचे असल्यास ते तातडीने सिस्टीममधूनच नोंदवावे. सिस्टीममध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारीच ग्राह्य धरण्यात येतील, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर, येणाऱ्या माहितीचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा. विद्यार्थ्यांनी ऐनवेळी नोंदवलेला ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक बदलवू नये.

परीक्षेला घाबरू नका संपर्क साधा
विद्यार्थ्यांनी सत्र व सराव परीक्षा देण्यासाठी sppuexam.in या वेबसाइटचा वापर करावा लागणार आहे. परीक्षांबाबतच्या सर्व सूचना, माहिती पुस्तिका, व्हीडिओ या वेबसाइटवर उपलब्ध राहतील. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक अडचणीमुळे खंड निर्माण झाल्यास, परीक्षेचा कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी सोडवलेली उत्तरे जतन करण्यात येतील. परीक्षेच्या दरम्यान काही अडचण उद्भल्यास विद्यार्थ्यांनी ०२०-७१५३०२०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

* ब्राउझरमध्ये आपला कॅमेरा सुरू होतो का, हे तपासून पाहा. त्यासाठी टेस्टिंग सॉफ्टवेअर वापरा.

*ऑनलाइन परीक्षा सुरू असताना इंटरनेट डिसकनेक्ट होणार नाही, याची काळजी घ्यावी.

* पहिल्या पंधरा मिनिटात पेपर सबमिट करू नये.

* उत्तरे सोडवताना इंटरनेट कनेक्ट असल्याची खात्री करावी अन्यथा उत्तरे सेव्ह होणार नाहीत.

* प्रॉक्टर्ड मेथडमध्ये विद्यार्थी गैरप्रकार करतांना आढल्यास त्याला १२ वेळा समज देण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार परीक्षा बंद होईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या