Ticker

6/Breaking/ticker-posts

' मुख्यमंत्र्यांचे भाषण डीडी सह्याद्रीवर लाइव्ह का नाही?' दूरदर्शनच्या माजी कर्मचाऱ्याने उठवला आवाज..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- मुख्यमंत्री उद्वव ठाकरे  यांचे होत असलेले 'फेसबुक लाइव्ह' सरकारी वाहिनी असलेल्या डीडी सह्याद्रीवर थेट प्रक्षेपित केले जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे अंश रात्रीच्या आणि दुसऱ्या दिवशीच्या बातम्यांमध्ये दाखवले जातात. या संपूर्ण प्रकाराविरोधात दूरदर्शनच्या एका माजी कर्मचाऱ्याने आवाज उठवला आहे.

 महेंद्र बैसाणे गेले वर्षभर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांशी साधलेला संवाद डीडी सह्याद्रीवर थेट प्रक्षेपित केला जावा, यासाठी दूरदर्शन अधिकाऱ्यांपासून मंत्रालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा संवाद प्रादेशिक वाहिनीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणे का गरजेचे वाटत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या वर्षी एकूण ३३ वेळा मुख्यमंत्री ठाकरे यांचे फेसबुक लाइव्ह झाले. त्या वेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वेळाही हा लाइव्ह संवाद सह्याद्रीवरून दाखवण्यात आला नाही. गेल्या वर्षी २८ एप्रिलला त्यांनी सह्याद्री वाहिनीशी या संदर्भात पत्रव्यवहार केला. त्या आधीही मुख्यमंत्र्यांनी १६ ते १७ वेळा संवाद साधला होता. या पत्रव्यवहारानंतर एक किंवा दोन वेळा लाइव्ह दाखवण्यात आले. त्यानंतर पुन्हा नकारच पदरात पडल्याचे बैसाणे यांनी सांगितले.

' १३ एप्रिलला मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांशी साधलेला संवाद नागरिकांपर्यंत पोहोचवणे सह्याद्रीसाठी गरजेचे का नव्हते,' अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्या वेळी संगीत नाटक दाखवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणी दूरदर्शनकडून माहिती घेण्याचे आश्वासन मिळूनही त्याचे आजवर उत्तर मिळालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाषण दाखवणे बंधनकारक नाही

मुख्यमंत्र्यांचे भाषण दाखवणे हे बंधनकारक नसल्याचे उत्तर दूरदर्शनच्या अधिकाऱ्याने दिले. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेम्पती यांनी सह्याद्री ही २४ तास वृत्तवाहिनी नसल्याने आधी नियोजन करून मग लाइव्ह दाखवता येऊ शकते, असे सांगितले. यासाठी संबंधित माहिती आधी हातात मिळणे गरजेचे असते, असेही ते म्हणाले. या संदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी इतर वाहिन्यांना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची माहिती देण्यात येते त्याच वेळी ती सह्याद्रीलाही जाते, असे सांगितले. हा संवाद खूप आधी नियोजित नसतो. दूरदर्शन केंद्राच्या अखत्यारित असल्याने यासाठी आग्रही भूमिका घेता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या