Ticker

6/Breaking/ticker-posts

परीक्षा रद्द असल्याने शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करा; शिक्षकांची मागणी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले होते. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने वर्षभरात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. मात्र आता परीक्षा रद्द करण्यात आल्याने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

शालेय शिक्षण विभागाने जूनपासून ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिले. शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाचा अनुभव व प्रशिक्षण नसतानाही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समाधानकारक ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. यंदा पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक सत्रही संपले आहे. मात्र शासनाने उन्हाळी सुट्टीसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ३० एप्रिलपासून आणि शिक्षकांना १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर २ मे ते १५ जून उन्हाळी सुट्टी जाहीर केली जाते. यंदा शासनाकडून सुट्टी बाबतीत कोणतीही सूचना शाळांना दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना सुट्टी मिळणार किंवा नाही, याबाबत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शाळांना दीर्घ सुट्टी जाहीर करण्याचा स्वतंत्र अधिकार नाही. सलग ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही होण्याची शक्यता आहे. सुट्टीचा निर्णयामुळे राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात एकसूत्रता राहील हे लक्षात घेऊन सरकारने उन्हाळी सुट्टी संदर्भात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या