Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र व्हेन्टिलेटरवर; विशाखापट्टनमला पहिली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दाखल लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः महाराष्ट्रात नियंत्रणाबाहेर जाणारी करोना संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेता राज्याला तातडीनं ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 'ऑक्सिजन एक्सप्रेस' चालवण्यात येत आहे. ही 'ऑक्सिजन एक्सप्रेस' राज्यात जाणवणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता थोड्या प्रमाणात दूर करू शकते. पहिली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' गुरुवारी सकाळी विशाखापट्टनम स्थित स्टील प्लान्टला दाखल झाली. याद्वारे महाराष्ट्राला तातडीनं ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा 'ऑक्सिजन एक्सप्रेस'द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. ' राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. प्लान्टमध्ये सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून ती महाराष्ट्राकडे रवाना करण्यात येणार आहे. उद्या दुपारी ३.०० वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होऊ शकते

महाराष्ट्राला १०० टनाहून अधिक ऑक्सिजनचा पुरवठा

सर्व टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळेस महाराष्ट्राला १०० टनाहून अधिक ऑक्सिजन मिळू शकेल. प्रोटोकॉलनुसार, टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी, वजन करण्यासाठी तसंच सुरक्षेची खात्री करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी २० - २४ तास लागू शकतात. त्यानंतरच ही स्पेशल रेल्वे महाराष्ट्राकडे रवाना होईल. महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्राला विशाखापट्टनम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम स्टील प्लान्टमध्ये 'एअर सेपरेशन प्लान्ट'मध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पाच युनिट कार्यरत आहेत. यांतील तीन युनिटची क्षमता ५५० टन तर दोन युनिटची क्षमता ६०० टन प्रतिदिन आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी 'एअर सेपरेशन प्लान्ट'मध्ये २६०० टन ऑक्सिजन गॅस आणि १०० टन लिक्विड ऑक्सिजनचं उत्पादन होऊ शकतं. RINL-  VSP कडून गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांत आणि इतर राज्यांत जवळपास ४०० टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता.

स्पेशल रेल्वे

यापूर्वी बुधवारी उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 'ऑक्सिजन एक्सप्रेस'ला झारखंडच्या बोकारो स्टील प्लान्टला पाठवण्यात आलं होतं. ' बोकारोहून लिक्विड ऑक्सिजन भरण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसला लखनऊहून बोकारोला पाठवण्यात येत आहे. यामुळे उत्तर प्रदेशला ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकेल. मध्य प्रदेशकडून केली जाणारी ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता इथेही ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात येईल. काही दिवसांत आणखीन अशा स्पेशल रेल्वेचं संचालन सुरू होईल' अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती.

 

ग्रीन कॉरिडॉर उभारणार

राज्यांकडून ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर केंद्राकडून १८ एप्रिल रोजी ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या जलद संचालनासाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात येणार आहे, अशी मागणी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय. येत्या काही दिवसांत लिक्विड ऑक्सिजन देशाच्या इतर भागांतही स्पेशल ट्रेनद्वारे पोहचवण्यात येणार आहे. यासाठी ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे.

ऑक्सिजनचं उत्पादन

स्टीलकारखान्यांत २८ ऑक्सिजन प्लान्ट आहेत. यामध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील प्लान्टचा समावेश आहे. या प्लान्टद्वारे दर दिवशी १५०० टन मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन करता येऊ शकतं. याशिवया ३० हजार मॅट्रिक टन अतिरिक्त साठाही वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. देशातील सर्वात मोठा स्टील निर्माता SAIL, टाटा स्टील आणि आर्सल मित्तल निप्पन इंडिया (MNS) यांनी रुग्णालयांत वापरण्यासाठी ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी घेतलीय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या