लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण
भागातून शहराकडे किराणा, भाजीपाला, फळे,
दूध आदी अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी
गर्दी होत असल्यास संबंधित दुकाने ही मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी डॉ. राजेश
देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मोकळी जागा उपलब्ध नसेल आणि
गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य होत नसेल तर ती दुकाने बंद करण्याचे अधिकारही
उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून
जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठविण्यात येत असतात. त्यामध्ये किराणा
सामान, भाजीपाला, फळे, दूध, बेकरी यांसारख्या
वस्तूंचा समावेश असतो. संबंधित माल हा शहराकडे पाठवताना त्या ठिकाणी गर्दी होत
असते. ती ठिकाणे मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. प्रत्येक
तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गर्दी होणारी ठिकाणे मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी
यांनी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी गर्दी
होणार नाही, याची खबरदारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी.
आवश्यकता भासल्यास संबंधित दुकाने बंद करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांनी
घ्यावा, असेही डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.
धार्मिक स्थळी विवाह समारंभ करता येणार
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक
गावांमध्ये धर्मिक स्थळी विवाह होत असतात. मात्र, धार्मिक स्थळे ही बंद असल्याने नागरिकांची अडचण होत आहे.
ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी धार्मिक स्थळी विवाह समारंभ
घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारच्या
निर्देशानुसार २५ लोकांच्या मर्यादित उपस्थितीत विवाह समारंभ करणे बंधनकारक
असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या