Ticker

6/Breaking/ticker-posts

'लोकांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकलंय, विरोधी पक्षानं १ मे पर्यंत घरीच बसावं'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: 'ठाकरे सरकारनं राज्यात लॉकडाउन केल्यास लोक रस्त्यावर उतरतील असं विरोधी पक्ष ओरडत होता. पण तसं काहीच झालेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाउन केलं आहे. लोकांनीही मुख्यमंत्र्यांचं ऐकलं आहे. त्यामुळं विरोधी पक्षानं आता १ मेपर्यंत घरीच बसावं,' असा सणसणीत टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काल रात्रीपासून राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्याशिवाय, अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षानं तीव्र विरोध दर्शवला होता. लॉकडाउनला लोकांचा तीव्र विरोध होईल, असा इशारा भाजपनं दिला होता. विरोधकांच्या या भूमिकेचा शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुकही केलं आहे.

' मुख्यमंत्री ठाकरे हे सात-आठ दिवस लॉक डाऊनसंदर्भात जनतेची मानसिकता तयार करीत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी बंदची आखणी केली आहे. सरकारच्या मनात आलं म्हणून मागचा पुढचा विचार न करता लॉकडाउन लादलं असं सरकारनं केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्बंधांची घोषणा करताना माणुसकीला प्राधान्य दिलं आहे. मागच्याप्रमाणे लॉक डाऊनची घोषणा होताच जो जेथे आहे तेथेच अडकून पडला असं झालेलं नाही, याची आठवणही शिवसेनेनं करून दिली आहे.

' करोनासंदर्भातली आणीबाणी फक्त महाराष्ट्रातच नाही. संपूर्ण देशच कोरोनाच्या जबड्यात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला नाही. उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यांत उच्च न्यायालयास हस्तक्षेप करून लॉकडाउन कराअसं सांगावं लागत आहे. याचा अर्थ, महाराष्ट्राप्रमाणं इतर राज्यांनी करोनाचं प्रकरण गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. करोनाचा विषाणू कुणालाच सोडत नाही. सध्याच्या संकटाच्या स्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी, पण शिस्त फक्त मरकजवाल्यांनी किंवा रमजानवाल्यांनीच पाळावी, चर्च किंवा गुरुद्वारांनी पाळावी या मानसिकतेतून आता बाहेर पडले पाहिजे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

' मुख्यमंत्र्यांनी बंद पुकारला, पण त्यांनी लोकांसाठी ज्या घोषणा केल्या त्या योग्य आहेत. सात  कोटी लोकांना सरकार एक महिना मोफत गहू-तांदूळ देणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर मोफत दिली जाईल. शेवटी बंदकाळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही. भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील. नाहीतर भुकेचा आगडोंब उसळून वणवा भडकेल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा आगडोंब उसळू नये याचीच फिकीर केली आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या