अ.नगर : मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे म्हणजे काय असते याचा प्रत्यय नगरमध्ये आला.
मृत करोनारुग्णाच्या
नावानेरेमडेसिव्हिरइंजेक्शन खरेदी करून ते
गरजूंना चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. मंगळवारी
रात्री गाडगीळ पटांगणात सापळा रचून पोलिसांनी एकाला अटक केली. केडगाव येथील एका
खासगी कोविड रुग्णालयातील कर्मचारीच हा प्रकार करीत असल्याचे आढळून आले. गुन्हा
दाखल झालेल्यांमध्ये एका नर्सचाही समावेश आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा सध्या तुटवडा
आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
चढ्या भावाने विक्री होत असल्याची चर्चा होत असून, कारवाईही होत आहे. तरीही अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच असा
गैरप्रकार करण्याचे धाडस होत आहे. नगर शहरातील केडगावच्या खासगी कोविड सेंटरमध्ये
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणारा प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
चार हजार रुपयांचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन
तब्बल १८ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईशा
राजू जाधव, शुभम विजय
नांदुरकर (रा. बुर्हाणनगर ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील
शुभम नांदुरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने मंगळवारी
मध्यरात्री ही कारवाई केली.
केडगाव येथील खासगी कोविड सेंटरमध्ये काम
करणारे कर्मचारी चढ्या भावाने रेमडेसिव्हिरची विक्री करत असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली होती. एका बोगस ग्राहकाला पाठवून नालेगाव परिसरातील गाडगीळ
पटांगणात सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे हे इंजेक्शन घेऊन येताच पथकाने त्यांना
पकडले. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. आरोपी मृत करोना
रुग्णांच्या नावावर हे इंजेक्शन खरेदी करून ते चढ्या भावाने विक्री करत असल्याचे
चौकशीत आढळून आले. खासगी कोविड केअर सेंटरच्या संलग्न असलेल्या मेडिकलमधून खरेदी
करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी अन्न व
औषध प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. आरोपीला पकडल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी
पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. मात्र, अधिकारी उपलब्ध न झाल्याने
डमी ग्राहकाच्या फिर्यादीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या