Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; मुख्यमंत्री उद्या संवाद साधणार?

 


लोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. राज्यातील करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक आहेत. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसं संकेतही दिले आहेत.

राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावाला लागेल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नाहीयेत, अशी परिस्थिती आहे. यामुळं महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल लवकरच त्यासंबंधी गाइडलाइन जारी करण्यात येतील, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे.

राज्यात बुधवारी रात्री आठपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच, उद्या रात्री आठनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लॉकडाऊन हा १५ दिवसांचा असेल. तसंच, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. मात्र, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासांतच कठोर लॉकडाऊनच्या गाइडलाइन जारी होईल अशी माहिती समोर येत आहे. तसंच, मुंबई लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार असल्याचं समजतंय.

दहावीच्या परीक्षा रद्द

सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणं महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या