लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: नगर
शहरातील वैद्यकीय क्षेत्रात आता चिंताजनक परिस्थिती उद्भवली असून प्रमुख खासगी
रुग्णालयांत पुढील काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन उरला आहे. त्यामुळे त्यांनी
आपल्याकडील रुग्णांच्या नातेवाईकांना त्याची सूचना दिली आहे. काही खासगी
रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातून तातडीची गरज म्हणून ऑक्सिजन
उपलब्ध करून दिला. त्यानंतर इतरांकडूनही मागणी सुरू झाली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचा
पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या संघाने आंदोलन
पुकारले असून सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयावर येण्यास सांगण्यात आले आहे.
आज सकाळी एका ट्रस्ट संचलित आणि एका खासगी
रुग्णालयातील ऑक्सिजन संपला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालात धाव घेऊन तातडीने
काही तरी व्यवस्था करण्याची मागणी केली. परिस्थिती जाणून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी
जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनमधून काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना
दिल्या. त्यानंतर अन्य खासगी रुग्णालयांतूनही ऑक्सिजनची मागणी सुरू झाली. जिल्हा
रुग्णायातील साठाही मर्यादित आहे. पुढेच काही तास तरी जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध
होण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे दाखल
रुग्णांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यास सुरूवात केली आहे. काही डॉक्टरांनी
सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून काही तरी हालचाली करण्याची विनंती केली.
त्यानुसार हिवरे बाजारचे उपसरंपच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित
मंत्र्यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नगर जिल्हा मोठा
असून त्या तुलनेत नगरला कोटा मिळावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने
पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी डॉ. गिरीष कुलकर्णी
यांनी म्हटले आहे की, शहरातील
प्रमुख १२ रुग्णालयांतील ऑक्सिजनची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे
ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या सातशे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच
रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाहीत. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सर्वांनी दुपारी साडेतीनपर्यंत तेथे
यावे. हे आंदलन बेमुदत असल्याचेही सांगण्यात आले. ऑक्सिजन पुरवठादारांकडे ऑक्सिजन
शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांनीही हतबलता व्यक्त केली आहे. आता
वरिष्ठ पातळीवरून काय व्यवस्था होते, याकडे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या