Ticker

6/Breaking/ticker-posts

बियरबारच्या दारात पुढाऱ्यांसाठी वशिल्याने लसीकरण?; ग्रामस्थ आक्रमक होताच..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जळगाव: जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात करोना लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वत्र लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या रांगा लागत आहेत. जळगाव तालुक्यातील कानळदा या गावातील आरोग्य केंद्रावरही शुक्रवारी लसीकरणासाठी नागरिकांच्या भर उन्हात अशाच रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र गावजावळील एका बंद असलेल्या बियरबारच्या परिसरात गावातील पुढाऱ्यांच्या आप्तेष्टांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केले जात असल्याचा धक्कादायक आरोप नागरिकांनी केला आहे. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी कानळदा आरोग्य केंद्रावर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, गैरसमजातून हा प्रकार झाल्याची सारवासारव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.

जळगाव शहरासह तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील करोना लसीकरण केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. जळगाव तालुक्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. दररोज प्राथमिक आरोग्य केंद्राला ११० डोस दिले जात आहेत. मात्र या ठिकाणी दररोज तीनशेहून अधिक नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

वशिल्याने लसीकरण होत असल्याने संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिक रांगेत उभे असताना कानळदा गावाबाहेर असलेल्या एका बियरबार परिसरात भोकर येथील एका पुढाऱ्याच्या कुटुंबीयांना लस दिली जात असल्याची माहिती गावातील काही युवकांना मिळाली. त्यानुसार युवकांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी देखील आढळून आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला. तसेच गाव पुढाऱ्यांना वशिल्याने केंद्र सोडून दुसरीकडे लसीकरण केले जात असल्याचाही आरोप संतप्त नागरिकांनी केला. नागरिकांचा गोंधळ वाढतच गेल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर तणाव निर्माण झाला. अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झालेला गोंधळाबाबत तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले.

घटनास्थळावरून पळाले कर्मचारी

वशिल्याचे लसीकरण सुरू होताच या ठिकाणी काही तरुण पोहचताच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढून आरोग्य केंद्र गाठले. या ठिकाणी एका व्यक्तीला लसीकरण करण्यात आल्याचा दावा देखील या युवकांनी केला आहे. इतरांनाही लसीकरण करण्यात येणार होते मात्र त्याआधीच त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याने इतरांना लसीकरण करता आले नाही अशी माहिती नागरिकांनी दिली. नागरिकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहून देखील लस मिळत नाही. मात्र दुसरीकडे वशिला लावून लोकप्रतिनिधींना लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. वाद वाढत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करून वाद शांत केला. या वादामुळे काही काळ लसीकरणाची प्रक्रिया देखील बंद पडली होती.

हा प्रकार गैरसमजातूनच

गावातील काही तरुणांच्या गैरसमजातून हा प्रकार घडला. संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी कीनोद या गावाला जात होते. त्यात काही नागरिकांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी थांबवले होते. मात्र, यामुळे नागरिकांचा गैरसमज झाल्याने वाद निर्माण झाला. मात्र, असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याची माहीती कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम. एन. पेशेट्टीवार यांनी दिली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या