संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता कडक निर्बंधांचे पालन आवश्यक
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपास्थतीत आढावा बैठक
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
त्यासाठी आता ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी क्रियाशील होण्याची आवश्यकता असून संसर्गाची साखळी तुटण्यासाठी पुढील १४ दिवस आता जिल्ह्यातील जनतेने जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन ना . मुश्रीफ यांनी केले .
पालकमंत्री मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, सध्या कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात नागरिक बाधित होत आहेत. अशावेळी कोरोना संसर्गाची साखळी तोडणे हे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळेच जिल्ह्यात जनता कर्फ्यू घोषित पाळण्याचा विचार पुढे आला. प्रत्येक जिल्हावासियांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी आता महत्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. यापूर्वी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाला होम आयसोलेशन केले जात होते. आता कडकपणे संस्थात्मक विलगीकरणच केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामदक्षता समिती आणि प्रभाग समित्यांनी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांबाबत कडक धोरण अवलंबले होते. आता या समित्यांनी पुन्हा सक्रीय होऊन गावात येणारा व्यक्ती हा बाधित नसेल, याची खात्री केली पाहिजे तसेच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची चाचणी केली गेली पाहिजे. तरच संसर्गाला आळा बसू शकेल. असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीर पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती असली तरी टास्क फोर्सने रेमडेसीवीर हे एकमेव जीवन रक्षक औषध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केवळ त्याच औषधाचा आग्रह धरणे योग्य नाही. जिल्ह्यात आपल्याला अजूनही अधिक ऑक्सीजनचा पुरवठा लागणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यालाही फटका बसला, वाढत्या रुग्णसंख्येवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक सुविधा वढवणे हा पर्याय आहे. त्यादृष्टीने शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडणारा बोजा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. शिर्डी आणि तेथील आसपासच्या पाच सहा तालुक्यातील रुग्णांना तेथे उपचार मिळणे शक्य होणार आहे.
नागरिकांनी दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. पुढील १४ दिवस नागरिकांनी आता स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याची वेळ आली आहे. सर्व नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केले पाहिजे. आरोग्य यंत्रणांवर पडणारा ताण कमी होण्याची गरज आहे. संसर्गाची साखळी तुटली तर हा ताण कमी होऊ शकतो आणि आपणही कोरोनापासून दूर राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक जागांवर नागरिक विनामास्क दिसणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे. नागरिकांनीही त्यादृष्टीने स्वताच्या आणि इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका क्षेत्रात तसेच काही तालुक्यांच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी यासाठी केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, नीलेश लंके, रोहित पवार, लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, , महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे आदीची यावेळी उपस्थिती होती .
0 टिप्पण्या