लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी
करोना परिस्थितीत हातात हात घालून काम करायचे ठरविले आहे. विखेंचा मतदारसंघ
असलेल्या शिर्डीत जिल्ह्याच्या सहा तालुक्यांसाठीचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णयही झाला
आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनीच पत्रकारांना दिली.
त्यापूर्वी त्यांनी शिर्डीत जाऊन विखे यांच्यासोबत बैठक घेतली. असे असले तरी
शिर्डीत अन्य तालुक्यांतील रुग्ण ठेवण्यास स्थानिकांचा विरोध कायम आहे. पालकमंत्री
मुश्रीफ शनिवारी नगरला आले होते. त्यांनी शिर्डी, कोपरगाव व
नगरला बैठका घेतल्या. पालकमंत्री नगरला येत नाहीत, म्हणून
विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात आणि
जातात, असा आरोप विखेंनी केला होता. शिर्डीत कोविड केअर
सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याला विखे
समर्थक आणि स्थानिक नागरिकांचा विरोध होता. शिर्डीत बाहेरच्या तालुक्यांचे रुग्ण
आणू नयेत, अशी त्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ
यांनी शिर्डीत बैठक घेतली. अगदी काही मिनिटांतच त्यांनी विखे आणि अधिकाऱ्यांशी
संवाद साधला.
यानंतर नगरमध्ये पत्रकारांना माहिती
देताना मुश्रीफ यांनी सांगितले की, विखेंसोबत आमची बैठक झाली आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. करोना
परिस्थितीशी लढताना आम्ही हातात हात घालून काम करणार आहोत. शिर्डी येथील साईबाबा
हॉस्पिटलआणि साईनाथ रुग्णालयात नगरच्या उत्तर भागातील सहा तालुक्यांसाठीचे कोविड
केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर शहरातील जिल्हा रुग्णालयावर
येणारा ताण कमी होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
0 टिप्पण्या