Ticker

6/Breaking/ticker-posts

..म्हणून मेळघाटातील गुराखी रविवारी दूध विकत नाहीत !

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अमरावती:- :-जैवविविधता व नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असणाऱ्या मेळघाटात कोरकू बिल्ल गोंड व गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हातमजुरी शेती व शेतीपूरक व्यवसायातून येथील आदिवासी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीसोबतच मेळघाटातील आदिवासी शेतकरी दररोज हजारो लिटर दूध जिल्ह्यात पाठवतात. मात्र निसर्गाशी नाळ जोडलेला आदिवासी शेतकरी गुराढोरांना प्रति कृतज्ञता व्यक्त करत रविवारी एक थेंब सुद्धा दुधाची विक्री न करता कोरे दूध किंवा ताक तयार करून जनावरांना पाजतात.

मेळघाटातील गवळी कोरकू व इतर आदिवासी समाजातील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. एका शेतकऱ्याकडे किमान ३० ते ३५ गायी व म्हशी असतातच. मेळघाटातील अनेक भागात वनविभागाने चराई प्रतिबंध केल्याने या गुराख्यांना वर्षभर चाऱ्याच्या शोधात भटकंती करावी लागते. मेळघाटातील शेतकरी प्रामुख्याने अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव पथरोड, आसेगाव, चांदूर बाजार, वलगाव, मोर्शी भागात जाऊन दुग्ध व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

रविवारी दूध विक्री न करण्याची परंपरा ही पिढ्यानपिढ्या सुरू असल्याची माहिती हे गुराखी बांधव देतात. महागाई शिखर गाठत असतानासुद्धा आपल्या गुराढोरांना प्रति कृतज्ञता व्यक्त करत रविवारी दुधाची विक्री परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. या परंपरेला धार्मिक किनार असली तरीसुद्धा त्यामागचा मुख्य उद्देश हा गुराढोरांना प्रती असलेला कृतज्ञताभाव आहे.


' आई खाऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी मेळघाटातील गुराखी बांधवांची स्थिती आहे. वनविभागाने मेळघाटातील शेकडो हेक्टर क्षेत्र चराईसाठी प्रतिबंधित केल्याने याचा फटका या गुराखी बांधवांना बसतो आहे. प्रतिबंधित क्षेत्रात चुकून एखादी गाय चरायला गेल्यास दोन हजार रुपये दंड देण्यात येतो. टाळेबंदीमुळे दुधाला अपेक्षेप्रमाणे मागणी नाही. लग्न समारंभ बंद असल्याने खव्याला सुद्धा भाव नाही. गावात थांबून व्यवसाय केल्यास गुराढोरांना एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा कुठून आणायचा, असा प्रश्न आहे. तर जंगलात नेल्यास वनविभागाच्या कारवाईची भीती असे दुहेरी संकट या गुराख्यांवर आहे. जंगलात चराई केल्यास गुरे विकून वनविभागाचा दंड भरण्याची वेळ येऊ नये यासाठी वर्षातील सात महिने भटकंती करावी लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. अशा परिस्थितीतही महागाईचे चटके सोसून हे गुराखी आपली परंपरा जपत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या