Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायला हवा : आदित्य देवचक्के

'अमेरिकेतील नासायन' या  पुस्तकाचे लेखक आदित्य देवचक्के यांंचे आवाहन
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सारडा विद्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 'अमेरिकेतील नासायन' या पुस्तकाचे लेखक आदित्य देवचक्के. समवेत शालेय समिती चेअरमन प्रा. मकरंद खेर, मुख्याध्यापक संजय मुदगल, पर्यवेक्षिका अलका भालेकर आदी (छाया समीर मन्यार)

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अ . नगर : -विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्याची क्षमता आजच्या तरुणाईमध्ये आहे. त्याला शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड दिली; तर जागतिक स्तरावर आपला देश निश्चितच महासत्ता बनेल, असा आशावाद 'अमेरिकेतील नासायन' या विज्ञान पुस्तकाचे लेखक आदित्य देवचक्के यांनी व्यक्त केला.

हिंदू सेवा मंडळाच्या सिताराम सारडा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देवचक्के बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन प्रा. मकरंद खेर होते. मुख्याध्यापक संजय मुदगल, पर्यवेक्षिका अलका भालेकर, शुभदा खेर, विज्ञान शिक्षिका क्रांती मुंदाणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी देवचक्के म्हणाले, गेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर शोधनिबंध सादरीकरणामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकविला आहे. २००८ पासूनचा वाढीचा हा वेग १०.३७ टक्के एवढा आहे ही देशासाठी निश्चितच गौरवाची बाब,पण तरीही पेटंट आणि ऍप्लिकेशन्सच्या बाबतीत आपण अजूनही अमेरिका आणि चीन या देशांच्या मागेच आहोत. प्रगतीमधील ही दरी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातच खोलवर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला हवा. सरकारने आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्याच्या काळात सुरू असलेले ऑनलाइन शिक्षण हा त्याचाच एक भाग आहे. कोव्हिडच्या काळात आपल्या देशाने स्वनिर्मित लस बनवून पंधराच्या वर देशांना त्याचा पुरवठाही केला ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. तरुणाईचं भविष्य उज्ज्वल असून त्यासाठी डोळे उघडे ठेवून अधिकाधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन करताना प्रा. खेर म्हणाले, 'विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत व प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज आहे. विज्ञानवाद माणसाला हुशार बनवीत असून भारताने त्यामुळेच वैज्ञानिक क्षेत्रात जगात मोठे यश संपादन केले आहे.हा आदर्श नजरेसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अध्ययनाचे काम केले पाहिजे.'

यावेळी मुख्याध्यापक संजय मुदगल, अलका भालेकर यांनी विज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अनोख्या पद्धतीने फक्त टाळी वाजवून बल्ब प्रज्वलित करून दिपप्रज्वलन करण्यात आले. वृषाली जोशी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षकांच्या वतीने विनोद देसाई, सुजाता खामकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपाली लगड यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय करून दिला. क्रांती मुंदाणकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या